दावोस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली, त्यासाठीचे सामंजस्य करार केले. या माध्यमातून ९२,२३५ रोजगार उपलब्ध होणार आहेत.
यातील एकच करार तीन लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले. उद्योगमंत्री उदय सामंत व ज्येष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिंदाल म्हणाले, बाहर बर्फ है...
‘दावोस में बाहर बर्फ पड रहा है, लेकिन अंदर गर्मी है’ असे म्हणत प्रख्यात उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी महाराष्ट्रात एकाच दिवशी झालेल्या विक्रमी गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितले, असे जिंदाल म्हणाले.