L&T Infrastructure Legacy : भारतामध्ये अनेक अद्वितीय आणि भव्य पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ज्यात पूल, स्टेडियम, महामार्ग, स्मारके आणि धार्मिक स्थळे यांचा समावेश आहे. हे प्रकल्प उभारण्यात अनेक कंपन्यांचा सहभाग असतो, पण काही कंपन्यांचा वाटा लक्षणीय आहे. तुम्हाला माहिती आहे का, देशात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, देशातील सर्वात मोठा पूल आणि जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या कंपनीने बनवला आहे? ही किमया साधली आहे लार्सन अँड टुब्रो या दिग्गज कंपनीने. पण, ही कंपनी नेमकी कुठली आहे? हे अजूनही अनेकांना माहिती नाही.
'एल अँड टी'चे 'युनिक' आणि महत्त्वाचे प्रकल्प
- लार्सन अँड टुब्रोने देशात अनेक महत्त्वपूर्ण आणि मोठे प्रकल्प उभे केले आहेत.
- भूपेन हजारिका सेतू: नदीवर बांधलेला भारतातील सर्वात लांब पूल.
- स्टॅच्यू ऑफ युनिटी : जगातील सर्वात उंच पुतळा (सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा).
- नरेंद्र मोदी स्टेडियम: जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम (गुजरातमध्ये).
- दिल्लीतील लोटस टेम्पल : राजधानीतील वास्तूशैलीचा प्रसिद्ध रचना.
- मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन): या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग.
- बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम.
- मुंबई कोस्टल रोड प्रकल्प.
- श्रीराम जन्मभूमी मंदिर (अयोध्येतील).
- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक.
L&T चे संस्थापक आणि मालक कोण?
एल अँड टी कंपनीची सुरुवात १९४६ मध्ये हेनिंग होल्क-लार्सन आणि सोरेन ख्रिश्चन टुब्रो या दोघांनी केली होती. त्यांच्याच नावावरून या कंपनीचे नाव 'लार्सन अँड टुब्रो' असे पडले. विशेष म्हणजे, हे दोघेही डेन्मार्कचे नागरिक होते. सध्या ए. एम. नाईक हे कंपनीचे चेअरमन एमेरिटस आहेत, तर एस. एन. सुब्रमण्यन हे चेअरमन आणि एमडी आहेत. आर. शंकर रमण हे सीएफओ आहेत. L&T ही एक पब्लिक लिस्टेड कंपनी असल्याने, तिचा कोणताही एक मालक नाही. यात सामान्य लोक, परदेशी गुंतवणूकदार, केंद्र सरकार आणि अनेक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पैसा गुंतलेला आहे.
ही कंपनी भारतात कशी आली?
१९४६ मध्ये मुंबईत एल अँड टीचे पहिले ऑफिस इतके लहान होते की, एका वेळी फक्त एकच व्यक्ती तेथे काम करू शकत होती. सुरुवातीला एल अँड टी डेनिश डेअरी इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करत होती. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, एल अँड टीने कोलकाता, मद्रास आणि नवी दिल्ली येथे कार्यालये उघडली. होल्क-लार्सन आणि टुब्रो यांनी हळूहळू एल अँड टीला विविध व्यवसायांमध्ये विस्तारणाऱ्या एका मोठ्या उद्योग समूहात रूपांतरित केले.
नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना
सध्या एल अँड टी कंस्ट्रक्शन आणि मायनिंग मशिनरी, डिफेन्स इक्विपमेंट, पॉवर जनरेशन इक्विपमेंट आणि रबर प्रोसेसिंग मशिनरी यांसारख्या अनेक वस्तूंचे उत्पादन करते.
वाचा - सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
आता लार्सन अँड टुब्रो इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस या नवीन सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. तामिळनाडू सरकारसोबत कंपनीने चेन्नईजवळ सुमारे २०० एकर जमिनीसाठी प्राथमिक चर्चा केली आहे. सुमारे १७ अब्ज डॉलरचा हा समूह आता टाटा समूहाप्रमाणेच एंड-टू-एंड मॅन्युफॅक्चरिंग क्षमता असलेला एक 'इंटिग्रेटेड प्लेयर' बनू इच्छितो.
