सरलेल्या २०२५ मध्ये महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं होतं. आता २०२६ या नव्या वर्षाची सुरुवातही महागाईच्या झटक्याने झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. ही वाढ दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांसह देशभरात लागू करण्यात आली आहे. ही वाढ १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे या सिलेंडरचे भाव १११ रुपयांपर्यंत वाढले आहेत.
एलपीजी सिलेंडरमधील ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये १५८०.५० रुपयांना मिळणारा १९ किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडर आता १६९१.५० रुपयांना मिळेल. तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६८४ रुपयांवरून वाढून १७९५ रुपये एवढी झाली आहे. याशिवाय मुंबईमध्ये १५३१.५० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलेंडर आता १६४२.५० रुपयांना मिळेल. तसेच चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलेंडररची किंमत १७३९.५० रुपयांवरून, १८४९.५० रुपयांपर्यंत वाढली आहे.
याआधी २०२५ या वर्षाच्या अखेरीस डिसेंबर महिन्यात १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यावेळी दिल्ली आणि कोलकातामध्ये १० रुपये तर मुंबई आणि चेन्नईमध्ये सिलेंडरच्या किमतीत ११ रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
