LPG Cylinder Shortage LIVE: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता भारतातील आयात होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर होऊ लागला आहे, ज्यामुळे देशातील अनेक भागांत व्यावसायिक (Commercial) एलपीजी सिलेंडर्सची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईमुळे गॅस एजन्सींसह हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडलीये. गॅस पुरवठ्यात होणारा विलंब आणि मर्यादित उपलब्धतेमुळे सिलेंडरची वितरण व्यवस्था विस्कळीत झाली असून, ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात हॉटेल-रेस्टॉरंट आणि अन्न व्यवसायावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून एलपीजी उत्पादनावर भर
वाढत्या अडचणी लक्षात घेऊन सरकारनं देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या प्राधान्य क्रमात बदल केला असून, आता एलपीजी उत्पादनाला सीएनजी आणि पाईप्ड कुकिंग गॅससह सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. सरकारच्या या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करत रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपल्या रिफायनरीमधून एलपीजीचं उत्पादन वाढवलंय. कंपनीनं मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, गुजरातच्या जामनगर येथील जगातील सर्वात मोठ्या रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्समधून एलपीजी उत्पादन जास्तीत जास्त करण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलली जात आहेत.
पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न
रिलायन्सनं स्पष्ट केलं की, त्यांचं पथक रिफायनरी ऑपरेशन्स अधिक सक्षम करण्यासाठी आणि एलपीजीचं उत्पादन वाढवण्यासाठी चोवीस तास काम करत आहे, जेणेकरून देशांतर्गत बाजारपेठेत गॅसचा पुरवठा स्थिर आणि विश्वासार्ह राहील. याचबरोबर KG-D6 बेसिनमधून मिळणारा नैसर्गिक वायू देखील सरकारी नियमांनुसार अशा क्षेत्रांना प्राधान्यानं पाठवला जाईल जिथे त्याची सर्वाधिक गरज आहे. इंधनाचा पुरवठा योग्य ठिकाणी आणि आवश्यक क्षेत्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनी भारत सरकारसोबत सातत्यानं समन्वय राखून काम करत आहे.
देशांतर्गत एलपीजी उत्पादनात १० टक्क्यांची वाढ
मध्य पूर्वेतील युद्धामुळे देशाच्या विविध भागांत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या टंचाईच्या बातम्या येत असताना सरकारनं मंगळवारी एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं. या निवेदनानुसार, देशातील एलपीजी उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून सर्व रिफायनरी सध्या त्यांच्या पूर्ण क्षमतेनं गॅस उत्पादन करत आहेत. सरकारनं ग्राहकांना दिलासा देताना म्हटले आहे की, देशातील घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी गॅसची कोणतीही कमतरता नाही आणि दररोज सरासरी ६० लाख सिलेंडर्सचा पुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीत जाणवणारी कोणतीही टंचाई उद्योगांकडून गॅस वळवून पूर्ण केली जात आहे.
