LIC Policy News: जर तुमची एलआयसी (LIC) पॉलिसी काही कारणास्तव बंद झाली असेल आणि ती तुम्हाला पुन्हा सुरू करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. एलआयसीनं बंद पडलेल्या वैयक्तिक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी (Revive) विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम १ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली असून ती २ मार्च २०२६ पर्यंत चालेल. या दोन महिन्यांच्या कालावधीत, तुम्ही तुमच्या जुन्या आणि बंद पडलेल्या ‘नॉन-लिंक्ड’ पॉलिसी कमी खर्चात पुन्हा सुरू करू शकता.
अनेकदा लोक आपली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकत नाहीत कारण त्यांच्यावर विलंब शुल्काचा मोठा बोजा येतो. ग्राहकांची हीच अडचण लक्षात घेऊन एलआयसीनं यावेळी आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. ‘नॉन-लिंक्ड’ विमा योजनांच्या विलंब शुल्कात ३० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. ही सूट जास्तीत जास्त ५,००० रुपयांपर्यंत असू शकते. गरीब वर्गातील लोकांसाठी, ज्यांनी ‘सूक्ष्म विमा’ पॉलिसी घेतल्या होत्या, त्यांच्यासाठी विलंब शुल्कावर पूर्ण १००% सूट दिली जात आहे. म्हणजेच त्यांना दंड म्हणून एकही रुपया द्यावा लागणार नाही.
१ मार्चपासून ATM मधून ५०० रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत का? काय आहे या व्हायरल दाव्यामागचं सत्य
या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?
एलआयसीने स्पष्ट केलं आहे की, ही मोहीम अशा पॉलिसीधारकांसाठी आहे जे काही कठीण परिस्थिती किंवा आर्थिक टंचाईमुळे वेळेवर प्रीमियम भरू शकले नाहीत.
पात्रता: अशा पॉलिसी ज्या प्रीमियम भरण्याच्या कालावधीत बंद झाल्या आहेत, परंतु ज्यांची 'मॅच्युरिटी' (मुदत) अजून पूर्ण झालेली नाही, त्या या योजनेअंतर्गत पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात.
महत्त्वाची टीप: ही सूट केवळ दंडावर लागू आहे. जर पॉलिसी सुरू करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय किंवा आरोग्य तपासणीची गरज असेल, तर त्यात कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
विमा पॉलिसी सुरू ठेवणं का महत्त्वाचं?
एलआयसीच्या म्हणण्यानुसार, विम्याचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा पॉलिसी सक्रिय असते. जर पॉलिसी बंद राहिली, तर मृत्यू लाभ किंवा इतर मॅच्युरिटी लाभ मिळणं कठीण होतं. तुमचं रिस्क कव्हर पुन्हा मिळवण्यासाठी ही मोहीम एक उत्तम मार्ग आहे. जर तुमचीही एखादी पॉलिसी बंद असेल, तर तुमच्या जवळच्या एलआयसी शाखेत जाऊन किंवा तुमच्या एजंटला भेटून या विशेष सवलतीचा लाभ घेऊ शकता. लक्षात ठेवा, ही संधी केवळ २ मार्च २०२६ पर्यंतच उपलब्ध आहे.
