retirement planning : अनेकजण निवृत्तीचे प्लॅनिंग करत नाही किंवा या गोष्टीला हलक्यात घेतात. तर काही पुढचे पुढे पाहू असं म्हणून टाळतात. पण, ही गोष्ट नंतर तुम्हाला फार महागात पडू शकते. आज प्रत्येकाला वेळेत निवृत्तीचे नियोजन करणे फार आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल. जर तुम्हाला निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेची चिंता वाटत असेल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची 'जीवन उत्सव' पॉलिसी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.
ही योजना खास करून निवृत्तीनंतर नियमित मासिक पेन्शन मिळवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही एक पारंपरिक योजना असल्यामुळे यावर शेअर बाजारातील चढ-उतारांचा कोणताही परिणाम होत नाही. या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा १५,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
एलआयसीच्या जीवन उत्सव पॉलिसीमध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ५ वर्षांपासून ते १६ वर्षांपर्यंत प्रीमियम भरण्याचा पर्याय मिळतो. गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त असेल, तितकी तुमची पेन्शनची रक्कम वाढते.
- विमा रक्कम: या पॉलिसीमध्ये तुम्हाला किमान ५ लाख रुपयांची विमा संरक्षित रक्कम मिळते, ज्यामुळे तुमची मूळ गुंतवणूक सुरक्षित राहते.
- गुंतवणुकीसाठी वय: ८ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतचे कोणतेही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
- जीवन विमा संरक्षण: या पॉलिसीमध्ये फक्त पेन्शनच नाही, तर तुम्हाला आयुष्यभरासाठी जीवन विमा संरक्षण देखील मिळते.
- मृत्यू लाभ: जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी मॅच्युअर होण्यापूर्वी झाला, तर नॉमिनीला जमा केलेल्या एकूण प्रीमियमच्या १०५% रक्कम बोनस म्हणून मिळते.
५.५% वार्षिक व्याज दर आणि लवचिकता
या योजनेत वार्षिक ५.५% दराने व्याज मिळते. हे व्याज 'डिलेड अँड क्युमुलेटिव्ह फ्लेक्सी इन्कम बेनिफिट' म्हणून दिले जाते. पॉलिसीधारक आपल्या गरजेनुसार नियमित मासिक पेन्शन किंवा फ्लेक्सी इन्कम बेनिफिट (आवश्यकतेनुसार पैसे काढण्याची सुविधा) यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतो.
वाचा - GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
थोडक्यात, एलआयसीची जीवन उत्सव पॉलिसी ही कमी जोखीम घेऊन निवृत्तीनंतर नियमित आणि सुरक्षित उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक उत्तम योजना आहे.