भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. एलआयसी गोल्डन ज्युबली स्कॉलरशिप स्कीम 2024 असे या योजनेचे नाव आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल मुलांना मदत केली जाईल. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे. एलआयसीच्या वेबसाइटनुसार, या योजनेसाठी अर्ज केवळ ऑनलाइनच करता येतात. ही शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आहे.
एलआयसीने सांगितले की, ही योजना भारतातील अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, जे 2021-22, 2022-23 किंवा 2023-24 या शैक्षणिक वर्षात किमान 60 टक्के किंवा CGPA ग्रेडसह 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा समकक्ष परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये कोणत्याही अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे. फक्त हेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
या योजनेद्वारे शिष्यवृत्ती दोन भागात विभागली आहे. पहिली म्हणजे जनरल शिष्यवृत्ती आणि दुसरी म्हणजे मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती. यामध्ये सुद्धा जनरल शिष्यवृत्तीचे दोन भाग आहेत, पहिल्यामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिकणारी मुले असतील आणि दुसऱ्यामध्ये कोणत्याही सरकारी महाविद्यालयातून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि आयटीआय डिप्लोमा करणारे विद्यार्थी असतील. 10वी नंतर 10+2 पॅटर्ननुसार इंटरमिजिएट करणाऱ्या किंवा आयटीआय किंवा पॉलिटेक्निक सारखा डिप्लोमा करणाऱ्या मुलींसाठी वेगळी शिष्यवृत्ती असणार आहे.
जनरल शिष्यवृत्तीसाठी किती मिळतील पैसे?
जनरल शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या मुला-मुलींना शिष्यवृत्ती मिळेल. या विभागांतर्गत, वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना दरवर्षी 40,000 रुपये दिले जातील. त्याचबरोबर अभियांत्रिकी क्षेत्रात बी.टेक वगैरे करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 30 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दुसरीकडे, ज्या मुलांनी सरकारी कॉलेजमधून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे किंवा सरकारी कॉलेजमधून आयटीआय करत आहेत. त्यांना अभ्यासक्रम चालू असेपर्यंत दरवर्षी 20,000 रुपये आणि 10,000 रुपये शिष्यवृत्ती मिळेल.
मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती
या योजनेंतर्गत दहावीनंतर विशिष्ट अभ्यासक्रमात डिप्लोमा किंवा आयटीआय यासारखे कोर्स करावे लागतील. यासाठी 15,000 रुपये दिले जातील, जे 2 वर्षांसाठी 7500 रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये दिले जातील.