LIC Stocks: मार्च तिमाहीत भारतीय शेअर्समध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली आणि परदेशी गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) एकाच वेळी हजारो कोटी रुपयांची खरेदी केली. एलआयसीनं मार्च तिमाहीत ४७,००० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे शेअर्स खरेदी केले, ज्यामुळे भारतीय बाजाराला मोठा आधार मिळाला.
३५१ कंपन्यांमध्ये गुंतवणूक, १३ नव्या शेअर्सची भर
एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या एकूण ३५१ शेअर्स आहेत. मार्च तिमाहीत एलआयसीनं १३ नव्या शेअर्ससह १०५ शेअर्समधील आपला हिस्सा वाढवला आहे. त्याचवेळी कंपनीनं ८६ शेअर्समधील हिस्सा कमी केला आणि १५ कंपन्यांकडे पूर्णपणे किंवा १ टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा असल्यानं त्याचं नाव शेअरहोल्डिंग डेटामधून गायब झाले.
Hero MotoCorp आणि Reliance मध्ये मोठी गुंतवणूक
एलआयसीची सर्वात मोठी गुंतवणूक हीरो मोटोकॉर्पमध्ये आहे. विमा कंपनीनं मार्च तिमाहीत ४,९६८ कोटी रुपयांची गुंतवणूक करताना हीरो मोटोकॉर्पमधील आपला हिस्सा ५.५३ टक्क्यांवरून ११.८४ टक्क्यांवर नेला. आरआयएलमध्ये मार्च तिमाहीत कंपनीने ३,६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे कंपनीतील त्यांचा हिस्सा ६.५२% वरून ६.७४% पर्यंत वाढला.
एलआयसीनं लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) मध्ये २,९७५ कोटी रुपये, एशियन पेंट्समध्ये २,४६६ कोटी रुपये, हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये २,३६१ कोटी रुपये, बजाज ऑटोमध्ये १,९८३ कोटी रुपये, एसबीआयमध्ये १,६५२ कोटी रुपये, पतंजली फूड्समध्ये १,६३८ कोटी रुपये, टाटा मोटर्समध्ये १,५७८ कोटी रुपये, मारुती सुझुकीमध्ये १,४९३ कोटी रुपये, एचसीएल टेकमध्ये १,४४१ कोटी रुपये आणि एचसीएल टेकमध्ये १,४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याशिवाय भारत इलेक्ट्रॉनिक्स, नेस्ले इंडिया, एलटीआय माइंडट्री, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि आयटीसी मधील आपला हिस्सा १,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे.
कंपनीने मार्च तिमाहीत १३ नवीन शेअर्समध्ये गुंतवणूक केली. सर्वात जास्त गुंतवणूक आयआरएफसीमध्ये करण्यात आली, ज्यात विमा कंपनीनं १,८१५ कोटी रुपयांना १.०५ टक्के हिस्सा खरेदी केला. त्याखालोखाल जिंदाल स्टेनलेस आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीज ने अनुक्रमे सुमारे ६४० कोटी आणि ४८५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
उर्वरित नवीन शेअर्समध्ये पंजाब अँड सिंध बँक, बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस, जेटीएल इंडस्ट्रीज, एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स, क्वालिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, एव्हलॉन टेक्नॉलॉजीज, जय कॉर्प, बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रवेग यांचा समावेश आहे. आयटीसी लिमिटेडपासून वेगळं झाल्यानंतर विमा कंपनीला आयटीसी हॉटेल्सचे ३,३२५ कोटी रुपयांचे अतिरिक्त शेअर्स मिळाले, जे ९.२२ टक्के हिस्स्याइतके आहे.
एलआयसीचा एकूण पोर्टफोलिओ
मार्च तिमाही अखेर एलआयसीचा एकूण पोर्टफोलिओ १५.१८ लाख कोटी रुपये होता, जो मागील तिमाहीतील १५.८८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत किंचित कमी आहे.