LIC Bima Sakhi Yojna : अनेकदा कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे महिलांना इच्छा असूनही पूर्णवेळ काम करता येत नाही. तुम्हीही यापैकीच एक असाल तर तुमच्यासाठी आता संधी उपलब्ध झाली आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. एलआयसीने खास महिलांसाठी 'बीमा सखी योजना' सुरू केली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना दरमहा निश्चित उत्पन्न तर मिळतेच, पण त्यासोबत कमिशनही मिळते.
प्रशिक्षण मोफत, दरमहा उत्पन्नाची संधी
केंद्र सरकारच्या माध्यमातून डिसेंबर २०२४ मध्ये या खास योजनेची सुरुवात झाली होती. महिलांना सशक्त करणे, त्यांना मासिक उत्पन्न मिळवून देणे आणि एलआयसीचा विस्तार दुर्गम भागांपर्यंत पोहोचवणे हा या 'बीमा सखी' योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तुम्हाला एकही पैसा खर्च न करता दरमहा ७,००० रुपये कमावण्याची संधी मिळते.
मासिक उत्पन्नासह कमिशन
बीमा सखी योजना सुरू होताच सुपरहिट ठरली आहे. एका महिन्यातच ५०,००० हून अधिक महिलांनी या योजनेत नोंदणी केली होती. ही योजना केवळ महिलांसाठी रोजगाराचे नवीन मार्ग उघडणारी नाही, तर देशातील वंचित क्षेत्रांमध्ये विमा पोहोचण्यासही मदत करते. या सरकारी योजनेअंतर्गत, देशभरात सहभागी होणाऱ्या महिलांना एलआयसी एजंटचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रोत्साहन म्हणून खालीलप्रमाणे मासिक रक्कम दिली जाते.
- पहिल्या वर्षी : दरमहा ७,००० रुपये
- दुसऱ्या वर्षी : दरमहा ६,००० रुपये
- तिसऱ्या वर्षी : दरमहा ५,००० रुपये
या निश्चित मासिक उत्पन्नाव्यतिरिक्त, प्रशिक्षणानंतर एजंट म्हणून काम करताना महिलांनी आपले 'टार्गेट' (विमा विक्रीचे उद्दिष्ट) पूर्ण केल्यास, त्यांना कमिशन-आधारित इन्सेंटिव्ह देखील मिळतो.
अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
एलआयसीच्या 'बीमा सखी' योजनेसाठी अर्ज ऑनलाईन तसेच जवळच्या एलआयसी शाखेत जाऊन ऑफलाईन पद्धतीनेही करता येतो.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वर जा.
- पेजवर खाली स्क्रोल करा आणि 'Click for Bima Sakhi' या पर्यायावर क्लिक करा.
- स्क्रीनवर अर्ज उघडेल, त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
- माहिती तपासून कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा.
आवश्यक कागदपत्रे
- वयाचा दाखला
- निवास प्रमाण पत्र
- १०वी उत्तीर्ण झाल्याचे बोर्ड प्रमाणपत्र आणि त्याची अटेस्टेड प्रत.
- अर्जामध्ये कोणतीही चुकीची किंवा जुळणारी नसलेली माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
वाचा - जानेवारीपासून तुमच्या घरातील 'ही' वस्तू ३ ते १० टक्क्यांपर्यंत महाग होणार, कारण आलं समोर
योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?
- या योजनेसाठी वयोमर्यादा १८ ते ७० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
- जी व्यक्ती आधीच एलआयसी एजंट किंवा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.
- एलआयसीचे निवृत्त कर्मचारी आणि माजी एजंट.
- पती/पत्नी, मुले, आई-वडील, भाऊ-बहीण आणि सासरकडील नातेवाईक हे अर्ज करण्यास पात्र नाहीत.
