Lenskart IPO: आयवियर प्रॉडक्ट्स तयार करणारी भारतातील अग्रगण्य कंपनी लेंसकार्ट (Lenskart) लवकरच शेअर बाजारात उतरणार आहे. सॉफ्टबँक, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांसारख्या जागतिक गुंतवणूकदारांचा पाठिंबा असलेल्या या कंपनीच्या IPO ची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे.
IPO चे वेळापत्रक
अँकर इन्व्हेस्टर्ससाठी बोली: 30 ऑक्टोबर 2025
सार्वजनिक सब्स्क्रिप्शन ओपन: 31 ऑक्टोबर 2025
सब्स्क्रिप्शन क्लोज: 4 नोव्हेंबर 2025
शेअर अलॉटमेंट: 6 नोव्हेंबर 2025
लिस्टिंग (BSE आणि NSE): 10 नोव्हेंबर 2025
IPO चा आकार
लेंसकार्टचा IPO हा मेनबोर्ड लिस्टिंग असेल, जो BSE आणि NSE या दोन्ही प्रमुख निर्देशांकांवर लिस्ट होईल. कंपनी 2150 कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी करणार आहे. तर OFS (Offer for Sale) अंतर्गत 12.75 कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी आणले जातील. यापूर्वी 13.22 कोटी शेअर्स विक्रीची योजना होती, परंतु कंपनीच्या प्रमोटर नेहा बन्सल यांनी आपला OFS साइज 47.26 लाख शेअर्सनी कमी केला आहे. OFS मध्ये फाउंडर पीयूष बन्सल, नेहा बन्सल, अमित चौधरी, सुमित कपाही आणि काही जागतिक गुंतवणूकदार आपापले शेअर्स विक्रीस ठेवणार आहेत.
इश्यू प्राइस आणि व्हॅल्यूएशन
लेंसकार्टच्या IPO साठी इश्यू प्राइस अंदाजे ₹402 प्रति शेअर असू शकतो. या दरावर कंपनीचे एकूण वैल्यूएशन सुमारे ₹72,719 कोटी असेल, तर IPO चे एकूण आकारमान सुमारे ₹7,278 कोटी असेल. Schroders Capital Private Equity Asia (Mauritius) या प्रमोटर गुंतवणूकदाराने आपले 1.9 कोटी शेअर्स (1.13%) पूर्णपणे विकून कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
राधाकिशन दमानींची एन्ट्री
भारताचे दिग्गज गुंतवणूकदार आणि DMart चे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी अलीकडेच लेंसकार्टमध्ये आपला छोटा पण महत्त्वाचा हिस्सा विकत घेतला आहे. त्यांच्या पत्नी श्रीकांता आर. दमानी यांनी 23 ऑक्टोबर 2025 रोजी लेंसकार्टच्या प्रमोटर नेहा बन्सल यांच्याकडून ₹402 प्रति शेअर दराने 22,38,806 शेअर्स (0.13% हिस्सेदारी) विकत घेतले. या व्यवहाराची एकूण किंमत सुमारे ₹90 कोटी इतकी आहे.
(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
