Legal Warning : तुम्ही तुमची जुनी कार किंवा बाईक विकली असेल आणि आता त्या वाहनाशी आपला काहीही संबंध नाही, असे तुम्हाला वाटत असेल, तर कृपया सावध व्हा! केरळ उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने हे स्पष्ट केले आहे की, वाहन विकल्यानंतरही जर नोंदणी प्रमाणपत्र तुमच्या नावावर असेल, तर तुम्ही कोणत्याही रस्ते अपघाताच्या कायदेशीर जबाबदारीतून सुटू शकत नाही. नवी मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांत मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी-विक्री होत असते. अशा प्रत्येक वाहन मालकासाठी हा निर्णय एक मोठा इशारा आहे.
काय आहे केरळमधील प्रकरण?
७ सप्टेंबर २००६ रोजी केरळमधील तिप्पू सुलतान रोडवर एका भीषण अपघातात सुजीत नावाच्या युवकाचा मृत्यू झाला होता. समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्याला धडक दिली होती. अपघात करणाऱ्या मोटारसायकलच्या चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बाईकचे नोंदणी प्रमाणपत्र अजूनही जुन्या मालकाच्या नावावर होते, कारण नवीन मालकाने आरटीओमध्ये हस्तांतरणाची औपचारिकता पूर्ण केली नव्हती.
कोर्टाचा निर्णय : आरटीओ नोंदीत नावच अंतिम मालक
मोटर अपघात दावा न्यायाधिकरणने सुरुवातीला निर्णय दिला की, नुकसानभरपाईची जबाबदारी जुना मालक आणि चालक या दोघांवर आहे. न्यायालयाने मृत सुजीतच्या कुटुंबीयांना ७.५% व्याजासह ३,७०,८१० रुपये इतकी नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. जुन्या मालकाने हा निर्णय केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिला.
उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत (१० जुलै २०२५)
केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, वाहनाची नोंदणी ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, तोच कायद्याच्या दृष्टिने वाहनाचा मालक मानला जाईल आणि तोच जबाबदार असेल.
उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या 'नवीन कुमार विरुद्ध विजय कुमार' (२०१८) या प्रकरणाचा हवाला देत सांगितले की, जोपर्यंत आरटीओच्या रेकॉर्डमध्ये नाव बदलत नाही, तोपर्यंत ओनरशिप जुन्या मालकाकडेच राहते. न्यायालयाने जुन्या मालकाला आधी नुकसानभरपाईची रक्कम भरण्यास सांगितले आणि नंतर ही रक्कम त्याने नवीन मालकाकडून कायदेशीर प्रक्रियेद्वारे वसूल करण्याची मुभा दिली.
प्रत्येक वाहन मालकासाठी महत्त्वाचा धडा
- हा निर्णय महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ विक्रीचा करारनामा करणे पुरेसे नाही. कायदेशीर जबाबदारी टाळण्यासाठी या गोष्टी त्वरित करा.
- आरसी हस्तांतरण बंधनकारक: वाहन विकल्यानंतर आरटीओमध्ये जाऊन फॉर्म २९ आणि फॉर्म ३० भरून नोंदणी हस्तांतरित करणे बंधनकारक आहे.
वाचा - आरोग्य विमा की मेडीक्लेम? गंभीर आजार, ओपीडी आणि मॅटर्निटी कव्हरेज कशात मिळते, दोन्हीत किती फरक?
- विमा कंपनीला सूचित करा: वाहन विकल्यानंतर तातडीने विमा कंपनीला सूचित करा आणि पॉलिसी नवीन मालकाच्या नावावर हस्तांतरित झाली आहे, याची खात्री करा. जोपर्यंत विमा पॉलिसी अपडेट होत नाही, तोपर्यंत कायदेशीर जबाबदारी जुन्या मालकावरच राहते.
- पुराव्याची नोंद : तुमच्याकडे नोटरी केलेला करारनामा, भरलेली रक्कम आणि आरटीओमधील हस्तांतरणाची पावती यांसारखे विक्रीचे ठोस पुरावे ठेवणे आवश्यक आहे.