Lakshya Powertech IPO: लक्ष्य पॉवरटेक लिमिटेडचा आयपीओ बुधवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीचे शेअर्स एनएसईवर लिस्ट झाले आहेत. लक्ष्य पॉवरटेक लिमिटेडच्या शेअर्सनं शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली. एनएसईवर कंपनीचे शेअर्स ३४२ रुपयांवर लिस्ट झाले, जे १८० रुपयांच्या आयपीओच्या किमतीपेक्षा ९० टक्के प्रीमियम आहे.
लिस्टिंगनंतरही त्यात आणखी वाढ झाली आणि त्याला अपर सर्किट लागलं. यानंतर हा शेअर ३५९.१० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. म्हणजेच लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी १००% नफा कमावला आहे. १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत हा इश्यू गुंतवणुकीसाठी खुला होता. याचा प्राइस बँड १८० रुपये निश्चित करण्यात आला होता. तीन दिवसांत हा आयपीओ ५७३.३६ पट सब्सक्राइब झाला होता.
किती मिळालं सबस्क्रिप्शन?
एनएसईच्या आकडेवारीनुसार, ४९.९१ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी १,०८,३१,६३,२०० शेअर्ससाठी बोली लागली होती. सर्वाधिक क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सनं (QIB) गुंतवणूक केली. क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स श्रेणी २१२.१८ पट, तर किरकोळ गुंतवणूकदारांची श्रेणी ५९०.२६ पट सब्सक्राइब झाली. एसएमई आयपीओबाबत गुंतवणूकदारांमध्ये पहिल्या दिवसापासूनच जबरदस्त क्रेझ होती. कारण दुसऱ्या दिवशी हा इश्यू १६० पट आणि पहिल्या दिवशी ६० पेक्षा जास्त पट सब्सक्राइब झाला होता.
कंपनीबद्दल माहिती
ही कंपनी २०१२ मध्ये सुरू करण्यात आली. लक्ष्य पॉवरटेक लिमिटेडची सुरुवात मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल सेवांमध्ये एक्सपर्ट इंजिनिअरिंग, खरेदी, निर्मिती आणि कमिशनिंग सेवा प्रदाता म्हणून झाली. त्यानंतर कंपनीनं गॅसवर चालणारे वीज प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी ऑपरेशन अँड मेंटेनन्स (O&M) सेवांचा समावेश केला.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)