Bill Gates In Hindi TV Serial: टीव्ही आणि टेक जगाला जोडणारी एक अनोखी बातमी समोर आली आहे. १०५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आता टीव्हीवर दिसणार आहेत. बातमी अशी आहे की, स्मृती इराणी यांच्या सुपरहिट शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी २' मध्ये बिल गेट्स एक खास कॅमिओ (Cameo) करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स दोन एपिसोड्समध्ये दिसतील. हे खास एपिसोड्स २४ आणि २५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसारित होणार आहेत.
हे दोन्ही एपिसोड्स पूर्णपणे आरोग्याच्या जागरूकतेवर लक्ष केंद्रित करतील, विशेषतः गर्भवती महिला आणि नवजात शिशुंच्या आरोग्याच्या बाबतीत. बिल गेट्स यांचा हा कॅमिओ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या भागीदारीत तयार करण्यात आला आहे, जे जगभरातील आरोग्य आणि शिक्षणाच्या संबंधित मुद्द्यांवर काम करते.
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
बिल गेट्स यांचा कॅमिओ कसा असेल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शोमध्ये सामील होतील. शोची मुख्य नायिका तुलसी (स्मृती इराणी) यांच्याशी ते संवाद साधताना दिसतील. या संवादाचा विषय असेल - लहान शहरांमध्ये आरोग्य सेवा कशी मजबूत करता येईल आणि आई व बालकांच्या आरोग्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा.
तुलसी-मिहिर अमेरिकेला जाणार!
आणखी एक मनोरंजक ट्विस्ट म्हणजे, आगामी ट्रॅकनुसार तुळशी आणि मिहिर अमेरिकेला जाताना दिसतील. तिथेच बिल गेट्स यांच्याशी त्यांची भेट होईल. काही रिपोर्ट्सनुसार, या प्रवासादरम्यान हॉलिवूड अभिनेता विल स्मिथचाही गेस्ट अपीअरन्स होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, या वेळी 'सास-बहू' ड्रामामध्ये आंतरराष्ट्रीय रंगतही जोडली जाणार आहे.
मालिका नव्या रुपात
२००० ते २००८ पर्यंत घराघरात गाजलेली 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' आता सीझन २ सह परत आली आहे. पण या वेळी कथा केवळ नात्यांपुरती मर्यादित नाही. हा शो आता सामाजिक आणि तांत्रिक मुद्दे देखील जोडत आहे. बिल गेट्स यांचा हा कॅमिओ याच नवीन विचाराचा एक भाग आहे.