Ghee Price: केंद्र सरकारनं घरगुती वापराच्या अनेक आवश्यक वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. जीएसटी परिषदेनं २२ सप्टेंबर २०२५ पासून कमी केलेले जीएसटी दर लागू करून सणासुदीच्या काळात लोकांना मोठी भेट दिली होती. मात्र, या निर्णयाचा लाभ मिळून दीड महिनाही उलटला नाही तोच, कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे.
डेअरी उत्पादनंही (Dairy Products) जीएसटी कमी झाल्यामुळे स्वस्त झाली होती. याचा परिणाम तुपाच्या किरकोळ किमतीवरही झाला होता. परंतु, आता कंपनीनं, जीएसटी कमी झाल्यामुळे किमती जेवढ्या स्वस्त झाल्या होत्या, त्यापेक्षा तीनपट जास्त वाढवल्या आहेत.
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
नंदिनी तुपाच्या किमतीत मोठी वाढ
आम्ही कर्नाटकचा सर्वात मोठा डेअरी ब्रँड असलेल्या नंदिनी (Nandini) बद्दल बोलत आहोत. जीएसटी कमी झाल्यानंतर या कंपनीच्या तुपाची किंमत ३० रुपयांनी कमी झाली होती. आता कंपनीनं एकाच वेळी या किमतीत ९० रुपयांची वाढ केली आहे. साहजिकच, जीएसटी कमी झाल्यामुळे जी बचत झाली होती, त्याच्यापेक्षा तीनपट जास्त भार आता सामान्य नागरिकांच्या खिशावर पडेल. कंपनीनं या वाढीमागे उत्पादन खर्चात झालेली वाढ हे कारण दिलंय.
आता किंमत किती झाली?
कर्नाटक मिल्क फेडरेशननं (KMF) नंदिनी तुपाची किंमत ९० रुपये प्रति लिटरनं वाढवण्याची घोषणा केली आहे. आता ग्राहकांना यासाठी ७०० रुपये प्रति लिटर किंमत मोजावी लागेल. केएमएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या खर्चांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, जागतिक पातळीवरही मागणीमुळे किमती वाढत आहेत. "आमच्या तुपाचे दर सर्वात कमी दरांपैकी आहेत आणि जागतिक बाजारातील ट्रेंडनुसार जुळवून घेण्यासाठी व आर्थिक व्यवहार्यता कायम ठेवण्यासाठी ही वाढ आवश्यक आहे," असं त्यांनी सांगितलं.
जीएसटी कपातीनंतरची किंमत
सणासुदीच्या हंगामापूर्वी, जेव्हा २२ सप्टेंबर रोजी देशभरात जीएसटीचे कमी झालेले दर लागू झाले, तेव्हा नंदिनी तुपाची किंमत प्रति लिटर ६४० रुपये होती. जीएसटी कमी झाल्यानंतर ही किंमत ३० रुपयांनी कमी होऊन फक्त ६१० रुपये प्रति लिटर झाली होती. आता कंपनीनं एकाच वेळी ९० रुपये वाढवण्याचा निर्णय घेतल्याने या ब्रँडचं तूप ७०० रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. कंपनी लवकरच त्यांच्या इतर डेअरी उत्पादनांच्या किमतीही वाढवू शकते, असं काहींचं म्हणणं आहे.
इतर कंपन्यांच्या तुपाचे दर
अमूलचं तूप आधी ६५० रुपये प्रति लिटर होतं, जीएसटी कमी झाल्यानंतर ते ६१० रुपये प्रति लिटर झालंय.
सरस तुपाचा दर ऑक्टोबरमध्ये ३० रुपयांनी वाढल्यानंतर ५८१ रुपये प्रति लिटर झाला आहे.
पतंजलीचं सामान्य तूप ६५० ते ७०० रुपये प्रति लिटर किमतीत विकलं जात आहे.
मदर डेअरीचे सामान्य तूप ६४१ रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय.
