भारताच्या आयटी क्षेत्रात गेल्या दशकात १५.५ टक्के वाढ झाली आहे. वाढीचा थेट परिणाम नवीन लोकांच्या रोजगारावरही दिसून आला आहे. यामुळेच २०२२ च्या आर्थिक वर्षात IT क्षेत्रानं अतिरिक्त ५.५ लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. HR फर्म TeamLease Digital ने लॉन्च केलेल्या Talent Exodus Report मध्ये ही माहिती समोर आली आहे. भारतीय आयटी क्षेत्र २२७ अब्ज डॉलरचा उद्योग आहे. यात काम करणाऱ्यांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. आयटी क्षेत्र हे भारतातील सर्वात मोठे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे.
संशोधकांनी केलेल्या अंदाजानुसार २०२१ च्या पूर्ण वर्षात IT उद्योगानं २३-२५ टक्के वाढीसह दुहेरी अंकी वाढ पाहिली आहे. यावर्षी येथे २५.२ टक्के वाढ अपेक्षित आहे. अशा स्थितीत आगामी काळातही ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या तीन गोष्टींसाठी लोक नोकरी सोडताहेत
सर्वेक्षणात नमूद माहितीनुसार नोकरीच्या बाजारपेठेतील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे उच्च पगार हा कामगिरी सुधारण्याचा आणि नोकरीतील समाधान वाढवण्याचा एकमेव मार्ग आहे. मात्र, कर्मचारी वाढलेला पगार आनंदाने स्वीकारत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कंपन्यांच्या कर्मचार्यांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये फक्त पैसाच हवा असतो असे नाही.
सध्या कर्मचारी त्यांची फ्लेक्सिबिलिटी, करिअर ग्रोथ आणि त्यांचे मूल्य लक्षात घेऊन उच्च पगार असलेल्या कंपन्या सोडत आहेत. सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार ३३ टक्के कर्मचारी असे होते की त्यांनी कंपनी सोडण्याचं कारण असं होतं की कंपन्यांना त्यांची किंमत समजू शकली नाही. अशा परिस्थितीत कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची गुणवत्ता समजून घेणं आवश्यक आहे.
मोठ्या प्रमाणात प्रतिभावान कंपन्या सोडून जाण्याचं एक कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना असं वाटतं की त्यांना चांगले फायदे किंवा सुविधा दिल्या जात नाहीत. ५० टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्यामागचं हेच कारण सांगितलं आहे. तर 25 टक्के कर्मचाऱ्यांनी करिअरमध्ये प्रगती हे एक कारण आहे असल्याचं सांगितलं आहे.
२० लाखांहून अधिक लोक सोडणार नोकऱ्या!
सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार ५० टक्के कर्मचार्यांचे मत आहे की कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या करिअरच्या विकासासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. २७ टक्के लोकांनी सांगितलं की कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांना कायम ठेवण्यासाठी कंपनीच्या संस्कृतीवर काम केलं पाहिजे. लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे कर्मचाऱ्यांनी असाच विचार केला तर २०२५ पर्यंत २० ते २२ लाख लोक नोकरी सोडतील अशी माहिती समोर आली आहे.