Income Tax File : इन्कम टॅक्स भरणे अनेक लोकांसाठी एक किचकट आणि डोकेदुखीचे काम असते. त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि गुंतागुंतीची प्रक्रिया टाळण्यासाठी अनेकजण महागड्या सल्लागारांची मदत घेतात. पण आता हे काम सोपे आणि स्वस्त होणार आहे. जिओ फायनान्सने 'टॅक्सबडी' या कंपनीसोबत मिळून एक नवीन डिजिटल मॉड्यूल लाँच केले आहे, जे फक्त २४ रुपयांमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची सुविधा देत आहे.
कर भरण्यासाठी दोन सोपे पर्याय
जिओ फायनान्स ॲपमध्ये दोन मुख्य सुविधा देण्यात आल्या आहेत.
- कर भरणे (Tax Filing) : या फिचरमुळे तुम्ही जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली यापैकी कोणती तुमच्यासाठी फायदेशीर आहे, हे सहजपणे ठरवू शकता. तसेच, कलम 80C आणि 80D सारख्या कर सवलतींचा वापर कसा करायचा, याबद्दलही मार्गदर्शन मिळते. या सुविधेचा वापर करून तुम्ही स्वतः तुमचा टॅक्स रिटर्न भरू शकता, ज्यासाठी फक्त २४ रुपये शुल्क लागेल.
- कर नियोजक (Tax Planner): हे फिचर भविष्यातील कर नियोजनासाठी खूप उपयुक्त आहे. यात वैयक्तिक वजावट मॅपिंग, घरभाडे भत्ता तपासणे आणि दोन्ही कर प्रणालींची तुलना करण्याची सुविधा आहे. यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योग्य नियोजन करू शकता.
तज्ञांची मदतही उपलब्ध
जर तुम्हाला टॅक्स भरताना तज्ञांची मदत हवी असेल, तर ती सुविधाही ॲपवर उपलब्ध आहे. व्यावसायिक कर तज्ञांच्या मदतीने रिटर्न भरण्यासाठी ९९९ रुपयांपासून सेवा सुरू होतात. त्यामुळे पूर्वी हजारो रुपये खर्च होणारे काम आता खूप कमी खर्चात करता येईल.
वाचा - मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
या सुविधेचे फायदे काय आहेत?
- कमी खर्च: सर्वात मोठा फायदा म्हणजे फक्त २४ रुपयांमध्ये तुम्ही रिटर्न भरू शकता.
- वापरण्यास सोपे: हे ॲप वापरकर्त्यांसाठी सोप्या पद्धतीने डिझाइन केले आहे. तुम्ही कागदपत्रे अपलोड करण्यापासून ते योग्य कर प्रणाली निवडण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन मिळवू शकता.
- वेळेची बचत: प्रक्रिया जलद असल्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि त्रुटीची शक्यताही कमी होते.
- नंतरची मदत: रिटर्न भरल्यानंतर तुम्ही तुमच्या रिटर्नची स्थिती तपासू शकता, परतफेडीचा मागोवा घेऊ शकता आणि टॅक्सशी संबंधित सूचनांचे अलर्टही मिळवू शकता.