Jio BlackRock New Funds : रिलायन्स जिओ आणि अमेरिकेची मोठी वित्तीय संस्था ब्लॅक रॉक यांच्या भागीदारीतील जिओब्लॅक रॉक म्युच्युअल फंड आता भारतीय बाजारात आपले चार नवीन ॲक्टिव्ह फंड लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फंडांना सेबीने नुकतीच मंजुरी दिली आहे. हे चारही फंड वेगवेगळ्या गुंतवणूक गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहेत. यामध्ये दोन डेट फंड, एक सेक्टोरल रोटेशन फंड आणि एक आर्बिट्रेज फंडचा समावेश आहे.
लहान गुंतवणूकदारांना मोठा फायदा
या फंडांची सर्वात मोठी आणि आकर्षक गोष्ट म्हणजे, यामध्ये गुंतवणूक करण्याची किमान मर्यादा खूप कमी ठेवण्यात आली आहे. एकरकमी गुंतवणूक असो वा एसआयपी, दोन्हीसाठी किमान रक्कम फक्त ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. यामुळे लहान गुंतवणूकदार देखील या फंडांमध्ये अगदी सहजपणे सहभागी होऊ शकतील.
१. जिओब्लॅक रॉक सेक्टर रोटेशन फंड
ही एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम असेल. हा फंड सेक्टर रोटेशन या थीमवर काम करेल आणि दीर्घकाळात गुंतवणूकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. पोर्टफोलिओचा ८०% हिस्सा सेक्टर रोटेशन कंपन्यांच्या इक्विटीमध्ये गुंतवला जाईल. या फंडाचा परफॉर्मेंस निफ्टी ५०० इंडेक्सच्या तुलनेत मोजला जाईल.
२. जिओब्लॅक रॉक डेट फंड
कंपनीने डेट (कर्ज) विभागात दोन फंड लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
लो ड्युरेशन फंड : याचा पोर्टफोलिओ मॅकॉले ड्युरेशन ६ महिने ते १२ महिन्यांच्या दरम्यान ठेवला जाईल.
शॉर्ट ड्युरेशन फंड: याचा मॅकॉले ड्युरेशन १ वर्ष ते ३ वर्षांच्या दरम्यान असेल.
या दोन्ही फंडांचे मुख्य लक्ष्य नियमित उत्पन्न मिळवणे हे आहे.
३. जिओब्लॅक रॉक आर्बिट्रेज फंड
सेबीने आर्बिट्रेज फंडालाही मंजुरी दिली आहे. हा फंड रोख आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज बाजारात उपलब्ध असलेल्या आर्बिट्रेज संधींचा फायदा घेईल. यात ६५% पर्यंत गुंतवणूक इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जमध्ये आणि बाकी ३५% पर्यंत डेट व मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवली जाईल.
वाचा - निवृत्त लोकांसाठी धोक्याची घंटा! फक्त FD वर अवलंबून राहिल्यास तुमच्या पैशाचे मूल्य होईल अर्धे!
जिओब्लॅक रॉकच्या या नव्या फंडांमुळे भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात स्पर्धा वाढणार असून, गुंतवणूकदारांना नवे आणि आकर्षक पर्याय उपलब्ध होतील.
