रांची - बऱ्याचदा आपण सेलिब्रिटी, उद्योगपती यांनी लग्झरी कार, आलिशान बंगले खरेदी केल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. काही मोजक्या उद्योगपतींकडे स्वत:चं विमान असते. त्याच यादीत आणखी एका भारतीय उद्योगपतीचं नाव जोडले गेले आहे. देशातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक झारखंडमधील सुरेश जालान यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एक प्रायव्हेट जेट खरेदी केले आहे. झारखंडमधील सर्वात मोठे कार्बन रिर्सोस कंपनीचे मालक असलेले जालान यांनी १० सीटरचं विमान तब्बल ९० कोटींना विकत घेतले आहे. जालान यांच्या या व्यवहाराने सगळेच चकीत झालेत.
भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत २९९ व्या स्थानावर असलेले गिरिडीहचे प्रसिद्ध व्यावसायिक सुरेश जालान यांनी ९० कोटी खर्च करून एक प्रायव्हेट जेट खरेदी केले. १० सीट असणाऱ्या या विमानाने त्यांनी गिरिडीह विमानतळावरून सिंगापूरसाठी पहिले उड्डाण घेतले. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी या विमानाचं पूजन केले. या विमानाने पहिला प्रवास सिंगापूरसाठी केला. जालान यांचा विमान खरेदी व्यवहार त्यांची आर्थिक ताकद आणि जागतिक केनक्टिविटीचे संकेत देत आहे.
उद्योगपती सुरेश जालान यांची कंपनी कार्बन रिसोर्सेस कार्बनयुक्त कच्चा माल तयार करते. त्यांचा व्यवसाय भारतातील ५ राज्यांमध्ये पसरलेला आहे. ही भारतातील इलेक्ट्रोड पेस्टची सर्वात मोठी आणि एकमेव उत्पादक कंपनी आहे असं सांगितले जाते. या कंपनीची क्षमता दोन ठिकाणी वार्षिक १२०,००० मेट्रिक टन आहे. याशिवाय, कंपनी कॅल्साइंड पेट्रोलियम कोक, इलेक्ट्रिकली कॅल्साइंड अँथ्रासाइट, रॅमिंग पेस्ट, कार्बरायझर्स आणि इंजेक्शन कार्बन देखील तयार करते. कार्बन रिसोर्सेस या कंपनीची स्थापना १९९१ साली सुरेश जालान यांनी केली होती.