Japan Financial Crisis : जपानवर सध्या मोठे आर्थिक संकट घोंघावत असून, हे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक बँकर सार्थक आहुजा यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे याबद्दल गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, जपानमधील ३० वर्षांची परंपरा मोडीत निघाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. जगातील गुंतवणूकदारांसाठी जपानची 'येन कॅरी ट्रेड' नावाची ग्लोबल आर्बिट्रेज मशीन आता कोसळत आहे.
'येन कॅरी ट्रेड' म्हणजे काय?
दशकांपासून जपानमधील व्याजदर जवळजवळ ०% किंवा काहीवेळा नकारात्मक राहिले आहेत. यामुळे जपान जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक आवडते ठिकाण होते. संस्था आणि विदेशी गुंतवणूकदार जपानमधून अत्यंत स्वस्त दरात येन कर्ज घ्यायचे आणि तीच रक्कम अमेरिका, भारत किंवा इतर बाजारात गुंतवायचे, जिथे बॉन्ड आणि इक्विटीवर ४% ते ८% पर्यंत परतावा मिळत होता. ०% दराने कर्ज घ्यायचे आणि ५% कमवायचे. व्याज दरातील हा मोठा फरक गुंतवणूकदारांसाठी मोठा नफा होता. जपानचा 'येन कॅरी ट्रेड'चा उद्देश कर्ज स्वस्त ठेवणे हा होता, जेणेकरून कंपन्या आणि कुटुंबे खर्च आणि गुंतवणूक करू शकतील.
३० वर्षांचा ट्रेंड बंद!
जोपर्यंत जपानचे व्याजदर कमी होते, तोपर्यंत हा व्यापार सुरळीत चालू होता. पण आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. जपानमधील व्याजदर वाढून २.८% झाले आहेत, जो ३० वर्षांतील सर्वाधिक दर आहे. जपानमध्ये महागाईचा दर २५ वर्षांत प्रथमच २.५% च्या वर गेला आहे. यामुळे बँक ऑफ जपानला बाजारातील मागणी कमी करण्यासाठी व्याजदर वाढवण्यास भाग पाडले आहे. जपानने ३० वर्षांची ही 'ग्लोबल आर्बिट्रेज मशीन' बंद केली आहे आणि जागतिक बाजार यासाठी तयार नसल्याचा इशारा आहूजा यांनी दिला आहे.
कर्जाचा बोजा वाढण्याचे संकट
ृआहुजा यांनी या बदलामुळे जपानवर वाढणाऱ्या कर्जाच्या बोजाबद्दल मोठा इशारा दिला आहे. जर जपानमधील व्याजदर ३% च्या पुढे गेले, तर जपानवर आधीच असलेल्या जीडीपीच्या २.५ पट कर्जाचा बोजा आणखी वाढेल. या कर्जाचे व्यवस्थापन करणे कठीण होऊ शकते. 'कॅरी ट्रेड'वरील नफ्याचे मार्जिन आता जवळजवळ संपुष्टात येत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. गुंतवणूकदार आता जपानी कर्ज फेडण्यासाठी परदेशातील, विशेषत: अमेरिकेतील आपली गुंतवणूक विकू शकतात. यामुळे जागतिक शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढू शकतो.
