नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात केलेल्या अफरातफरीमुळे सेबीने अमेरिकन फर्म जेन स्ट्रीट विरुद्ध आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली आहे. यामुळे भारतात व्यवहार करणाऱ्या जागतिक ट्रेडिंग (एचएफटी) कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सेबीने केलेल्या या कारवाईमुळे भारतात कार्यरत असलेल्या अनेक वॉल स्ट्रीट कंपन्यांनी वापरलेले ‘ड्युअल-एंटिटी’ मॉडेल समोर आले आहे.
वेगवेगळ्या कायदेशीर संस्थांद्वारे कॉन्ट्रास्ट ऑर्डर देणे थेटपणे बेकायदेशीर नसले तरी, सामान्य मालकी आणि अल्गोरिदम वापरून केलेले हे व्यवहार ‘बाजारात गोंधळ’ निर्माण करणारे होते, असे सेबीने म्हटले आहे. यामुळे भारतात काम करणाऱ्या इतर एचएफटी कंपन्यांमध्ये चिंता वाढली आहे. यामुळे ब्रोकर्सना त्यांच्या अल्गोरिदममध्ये बदल करावे लागतील.
नेमके काय आहे ‘ड्युअल-एंटिटी’ मॉडेल?
सिटाडेल सिक्युरिटीज, आयएमसी फायनान्शियल मार्केट्स आणि जंप ट्रेडिंगसारख्या मोठ्या जागतिक कंपन्या भारतात एकाचवेळी दोन कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार करतात. यात एक एफपीआय म्हणून, विशेषतः करसवलतीसाठी सिंगापूर किंवा हाँगकाँगमधून, तर दुसरी भारतात नोंदणीकृत देशांतर्गत ट्रेडिंग फर्म म्हणून असे व्यवहार केले जातात.
भाजप म्हणते, बाजाराने लोकांना श्रीमंत केले
अमेरिकन ‘ट्रेडिंग’ कंपनी ‘जेन स्ट्रीट’शी संबंधित प्रकरणात केंद्र सरकारने सामान्य गुंतवणूकदारांना विनाशाच्या उंबरठ्यावर ढकलले आहे, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. सेबी इतके दिवस गप्प का? सरकार कोणाच्या इशाऱ्यावरून डोळे बंद करून बसले होते? सरकार श्रीमंतांना श्रीमंत करत आहे आणि सामान्य गुंतवणूकदारांना विनाशाकडे ढकलले आहे, असे राहुल म्हणाले. राहुल गांधी शेअर बाजाराबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत. म्युच्युअल फंड आणि आयपीओद्वारे बाजाराने लाखो किरकोळ गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण केली आहे, असे भाजपच्या अमित मालवीय यांनी म्हटले आहे.