Income Tax Return Due Date: तांत्रिक अडचणींमुळे आयकर विवरण पत्र दाखल करू न शकलेल्यांना आयकर विभागाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाने आयटीआर भरण्याची मुदत वाढवली आहे. एका दिवसानेच ही मुदत वाढवण्यात आली असून, प्राप्तिकर भरण्याची आज शेवटची संधी आहे. आयटीआर भरण्याची १५ सप्टेंबर अखेरची तारीख होती. आयकर विभागाने एका दिवसाने म्हणजे १६ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
आयकर विभागाने एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. आयकर विवरण पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. त्यात बदल करत १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अखेरच्या दिवशी लोकांना आयकर विवरण पत्र भरताना तांत्रिक अडचणी आल्या.
अनेकांकडून मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आयकर विभागाने आता मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सुरूवातीला स्पष्ट केले होते. मात्र, रात्री उशिरा एका दिवसाने मुदत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
आयकर विभागाकडून असेही स्पष्ट करण्यात आले की, १६ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपासून ते २.३० मेंटेनन्स केले जाणार आहे. त्यामुळे करदात्यांनी वेळेत विवरण पत्र दाखल करावे.
करदात्यांना आयकर विवरण पत्र भरताना आल्या अडचणी
१५ सप्टेंबर रोजी करदात्यांना आयकर विवरण पत्र दाखल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आयकर वेबसाईट बंद पडत होती. त्याचबरोबर प्रक्रिया खूपच संथपणे सुरू होती. अनेकांना टीडीएस डाऊनलोड करता येत नव्हता. एआयएमधील माहिती जुळत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या. त्यामुळे लोकांकडून सोशल मीडियावर मुदत वाढवण्याची मागणी केली गेली होती.
वेळेत कर भरला नाही, तर दंड भरावा लागणार
आयकर विभागाने निर्धारित केलेल्या मुदतीमध्ये आयकर विवरण पत्र दाखल केले नाही, तर तुम्हाला जास्तीचा दंड भरावा लागू शकतो. आयकर कायद्यातील २३४एफ नुसार निर्धारित वेळेत विवरण पत्र दाखल केले नाही, तर करदात्याला ५ हजार रुपयांपेक्षा जास्त दंड द्यावा लागतो. मुदत संपल्यानंतर कर भरणा करणाऱ्यांना ५००० दंड आकारला जातो. तर ज्यांचं उत्पन्न ५ लाखापेक्षा कमी आहे, त्यांना १००० रुपये दंड भरावा लागतो.