ITR Filing Deadline Extended 2025 : जर तुम्ही आयकर भरणारे नागरिक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आता तुम्ही १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत तुमचा ITR दाखल करू शकता. पूर्वी ही अंतिम मुदत ३१ जुलै होती, त्यामुळे आता तुम्हाला अतिरिक्त ४५ दिवसांचा कालावधी मिळाला आहे.
उशिरा ITR भरल्यास किती दंड लागेल?
- जरी अंतिम मुदत वाढवली असली तरी, ITR भरण्यास उशीर केल्यास तुम्हाला दंड लागू शकतो.
- जर तुम्ही १५ सप्टेंबरनंतर ITR दाखल केला, तर आयकर कायद्याच्या कलम २३४एफ अंतर्गत तुम्हाला १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत विलंबाने दाखल करण्याचे शुल्क भरावे लागेल.
- याशिवाय, तुम्हाला तुमचा परतावा मिळण्यासही विलंब होऊ शकतो.
कर भरण्याची अंतिम तारीख वाढली नाही!
- आयकर विभागाने ITR दाखल करण्याची तारीख वाढवली असली तरी, कर भरण्याची अंतिम तारीख मात्र ३१ जुलै २०२५ हीच होती. याचा अर्थ असा की
- जर तुम्ही ३१ जुलैनंतर कर भरला, तर तुम्हाला कलम २३४बी आणि २३४सी अंतर्गत व्याज भरावे लागेल.
- त्यामुळे, तुम्ही ITR नंतर भरला तरीही, वेळेवर कर जमा करणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड टाळता येईल.
अंतिम मुदत का वाढवण्यात आली?
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सांगितले आहे की, ही अंतिम मुदत वाढवण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत.
- ITR फॉर्ममध्ये बदल : या वर्षी अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत, जसे की भांडवली नफ्याचे नवीन अहवाल देणे आणि कर स्लॅबमध्ये सुधारणा.
- तांत्रिक सुधारणा : पोर्टलवरील तांत्रिक सुधारणा आणि TDS क्रेडिटमध्ये होणारा विलंब ही देखील कारणे आहेत.
- पोर्टलवरील गर्दी : अंतिम मुदतीच्या जवळ पोर्टलवर वाढणारी गर्दी कमी करण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाचा - FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
मुदत आणखी वाढेल का?
आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली असली, तरी ती आणखी वाढवली जाईल का, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, काही ITR फॉर्म अजूनही पूर्णपणे उपलब्ध नाहीत आणि तांत्रिक समस्या कायम आहेत. त्यामुळे, परिस्थिती सुधारली नाही, तर CBDT अंतिम मुदत आणखी वाढवू शकते, असे कर तज्ज्ञांना वाटते.
तरीही, करदात्यांना सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरच ITR दाखल करावा, जेणेकरून दंड आणि पोर्टलवरील गर्दी टाळता येईल.