Balaji Wafers : एकेकाळी वेफर्स म्हटलं की एकच कंपनी डोळ्यांसमोर येत होती लेस. मात्र, नंतर एका कंपनीने त्याच दर्जाचे वेफर्स आणि भुजिया अतिशय वाजवी दरात आणल्याने लेसचं मार्केट खूप कमी झाले. आज त्याच कंपनीत हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी रढाओढ सुरू झाल आहे. या कंपनीचे नाव आहे बालाजी वेफर्स. एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या आयटीसी आणि पेप्सिको बालाजीमध्ये हिस्सेदारी खरेदी करण्यास उत्सुक आहेत. त्यांच्यासोबतच टीपीजी आणि टेमासेक सारख्या मोठ्या खासगी इक्विटी कंपन्याही बालाजी वेफर्समध्ये सुमारे १०% हिस्सेदारी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. बालाजीचे अपेक्षित मूल्यांकन अंदाजे ४०,००० कोटी रुपये आहे.
छोट्या ब्रँड्सची मागणी वाढली
ईटीच्या रिपोर्टनुसार, स्नॅक मार्केटमध्ये प्रादेशिक ब्रँड्सची मागणी वाढत असून ते मोठ्या कंपन्यांना कडवी टक्कर देत आहेत. आयटीसीचा स्नॅक ब्रँड 'बिंगो' आणि चिप्समध्ये आघाडीवर असलेल्या पेप्सिकोलाही पारंपारिक स्नॅक्सच्या सेगमेंटमध्ये आपला बाजारपेठेतील हिस्सा गमावावा लागत आहे. बालाजीसारख्या प्रादेशिक ब्रँडसोबतचा करार पेप्सिकोला स्थानिक बाजारपेठेत मजबूत पकड मिळवून देईल.
२०१३ मध्येही पेप्सिकोने बालाजीमध्ये ४९-५१% हिस्सेदारी खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, पण बालाजीचे मालक विरानी कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. त्यामुळे, पेप्सिकोची ही दुसरी संधी आहे.
बालाजीच्या कमाईत मोठी वाढ
बालाजी वेफर्सने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५,४५३.७ कोटी रुपयांचा महसूल कमावला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ११% जास्त आहे. तसेच, कंपनीचा करानंतरचा नफा ४१% वाढून ५७८.८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीला मिळालेल्या यशामुळे, विरानी कुटुंबीय आता व्यवसायाला अधिक व्यावसायिक स्वरूप देण्याचा विचार करत आहेत. यासाठी, रोजच्या कामकाजाची जबाबदारी व्यावसायिक व्यवस्थापकांकडे सोपवण्यावर विचार सुरू आहे. अलीकडेच ९ सप्टेंबर रोजी वाडीलाल इंडस्ट्रीजनेही हिमांशू कंवर यांची पहिले गैर-कौटुंबिक सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.
भारतीय स्नॅक मार्केटमध्ये मोठी क्षमता
मार्केट रिसर्च फर्म 'आयमार्क ग्रुप'च्या मते, २०२३ मध्ये भारताची स्नॅक मार्केट ४२,६९४.९ कोटी रुपयांची होती. ही बाजारपेठ २०३२ पर्यंत दुप्पट होऊन ९५,५२१.८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या मोठ्या वाढीच्या अंदाजामुळेच बालाजीसारख्या प्रादेशिक कंपन्या मोठ्या ब्रँड्ससाठी आकर्षक ठरत आहेत. अलीकडेच मार्चमध्ये, हल्दीराम स्नॅक्समध्ये जागतिक गुंतवणूकदारांनी १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकनावर १०% हिस्सेदारी खरेदी केली होती, जो पॅकेज्ड फूड सेक्टरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार मानला जातो.