कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) ही नोकरदार वर्गासाठी हक्काची पुंजी असते. मात्र, सध्या ईपीएफ क्लेम नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये दाखल झालेल्या ६.२ कोटी क्लेम्सपैकी तब्बल १.६ कोटी क्लेम्स विविध कारणांमुळे फेटाळले गेले आहेत. विशेषतः अंतिम पैसे काढण्याच्या अर्जांमध्ये रिजेक्शनचा दर ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
अडचणी नेमक्या कुठे?
प्रामुख्याने, वैयक्तिक माहितीतील (नाव, जन्मतारीख) विसंगती, केवायसी अपूर्ण असणे, एकापेक्षा जास्त ‘युएएन’ क्रमांक असणे, जुन्या कंपनीतून नवीन कंपनीत पीएफ ट्रान्स्फर न होणे या त्रुटींमुळे अडचणी येत आहेत.
कंपन्या, प्लॅटफॉर्म मदतीला
अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी काही कंपन्या, प्लॅटफॉर्म महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्या आपली रक्कम मिळवून देण्यात मदत करतात.
मुलांचे शिक्षण, घराचे स्वप्न किंवा निवृत्तीनंतरची पुंजी अशा महत्त्वाच्या कामांसाठी पीएफची रक्कम गरजेची असते.
ऐनवेळी अडचण येऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी आपल्या ईपीएफ खात्यातील त्रुटी आधीच तपासून घेणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
जुन्या चुका कशामुळे उघड?
- ईपीएफओच्या प्रणालीत होत असलेल्या सुधारणांमुळे आता जुन्या त्रुटी त्वरित पकडल्या जात आहेत.
- यामुळे अनेक वर्षांपासून जमा असलेले पैसे मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
- कर्मचाऱ्यांना ईपीएफओ ऑफिसचे हेलपाटे मारावे लागतात.
