स्वप्नातल्या घराची चावी हातात पडणार, या आनंदात आपण जेव्हा होम लोनच्या कागदपत्रांवर सह्या करतो, तेव्हा 'होम लोन इन्शुरन्स'चा विषय समोर येतो. अनेकदा बँका हा विमा घेणे अनिवार्य असल्याचे भासवतात. पण, खरोखरच तुम्हाला या विम्याची गरज आहे का? की हा तुमच्या खिशावर टाकलेला अतिरिक्त भार आहे? जाणून घ्या सविस्तर.
नेमका फायदा काय?
होम लोन इन्शुरन्स हा प्रामुख्याने कर्जदाराच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी असतो. समजा, कर्ज फेडण्याच्या कालावधीत कर्जदाराचा मृत्यू झाला, तर विम्याची रक्कम थेट बँकेला दिली जाते. कर्ज फिटते. यामुळे घराचा ताबा कुटुंबाकडेच राहतो. वारसांवर कर्जाचा डोंगर कोसळत नाही. घरातील कमावणारी व्यक्ती एकच असेल, तर हा विमा मानसिक शांतता देणारा ठरतो.
कायदा काय सांगतो?
म लोन इन्शुरन्स घेणे कायदेशीररीत्या बंधनकारक नाही. तुमच्याकडे आधीच पुरेसा लाईफ इन्शुरन्स असेल, तर नवीन पॉलिसी घेण्याची गरज नसते. त्यामुळे बँकेच्या दबावाखाली न येता, आपल्या आर्थिक नियोजनानुसारच निर्णय घ्या.
हप्त्यांचे गणित
या विम्याचा हप्ता दोन प्रकारे भरता येतो. एक तर सुरुवातीलाच एकरकमी किंवा तो तुमच्या होम लोनच्या रकमेतच मिळवला जातो. जर तो लोनमध्ये मिळवला, तर त्यावरही तुम्हाला गृहकर्जाएवढेच व्याज भरावे लागते, जे दीर्घकाळात महाग पडते.
