IRCTC Site Down:रेल्वेचीतिकिटे ऑनलाईन बुक करणारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (IRCTC) वेबसाइट आज पुन्हा एकदा डाऊन झाली. तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या उद्भवल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईल ॲपचीही तीच अवस्था आहे, ते देखील काम करत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यात.
ही पहिली वेळ नाही
आयआरसीटीसीची रेल्वे तिकीट बुकिंग साइट डाऊन होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये तीन वेळा असं झालं आहे. यावेळी देखील, धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी, तात्काळ बुकिंग (Tatkal Booking) सुरू होण्याच्या वेळेस ही सेवा ठप्प झाली.
शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
वेबसाइटवर येणारा मेसेज
जेव्हा तुम्ही आयआरसीटीसीची साइट उघडाल, तेव्हा तुम्हाला एक मेसेज दिसेल. 'डाऊनटाइम मेसेज' (Down Time Message), पुढील एका तासासाठी बुकिंग आणि कॅन्सलेशन सेवा या साइटवर उपलब्ध नाही, असं यात लिहिलेलं दिसेल. गैरसोयीबद्दल क्षमस्व. कॅन्सलेशन आणि टीडीआर फाईल करण्यासाठी तुम्ही कस्टमर केअर नंबर १४६४६, ०८०४४६४७९९९ आणि ०८०३५७३४९९९ वर कॉल करा किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा.
रोज लाखो तिकीटं होतात बुक
रेल्वे तिकीट बुकिंगसाठी IRCTC.CO.IN ही एकमेव साइट आहे. यावर दररोज सुमारे १२.५ लाख तिकिटांची विक्री होते. रेल्वेच्या एकूण तिकिटांपैकी सुमारे ८४% तिकिटे आयआरसीटीसीच्या वेबसाइट आणि ॲपद्वारे बुक केली जातात.
तात्काळ बुकिंगच्या वेळी डाऊन
आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सकाळी १० वाजता ट्रेनच्या एसी श्रेणी (AC Class) साठी तात्काळ कोट्याच्या (Tatkal Quota) तिकीट बुकिंग उघडते. त्यानंतर एका तासानं म्हणजे सकाळी ११ वाजता नॉन-एसी (Non AC) ची बुकिंग सुरू होते. आज, म्हणजे शुक्रवारी, उद्याच्या धनत्रयोदशीच्या दिवसासाठी बुकिंग सुरू होणार होते. धनत्रयोदशीच्या दिवसासाठी तात्काळ तिकीट बुकिंगचं स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांचं स्वप्न यामुळे भंगलंय.