Iran-Israel-America War: इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यामुळे केवळ आखाती देश चिंतेत नाहीत, तर याची झळ आता भारतातील घराघरांपर्यंत पोहोचणार आहे. देशभरातील बाजारपेठांमध्ये स्वयंपाकाचं तेल, खजूर, बदाम, पिस्ता आणि अंजीर यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढू लागल्या आहेत.
तणावाचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर
'इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन'चे अध्यक्ष आणि 'इमामी ॲग्रोटेक'चे सीईओ सुधाकर देसाई यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील कोणत्याही प्रकारच्या तणावाचा भारताच्या कच्च्या तेलाच्या आणि खाद्यतेलाच्या बाजारावर थेट परिणाम होतो. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल-डिझेल आणि इतर इंधनं महाग होतात, ज्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढतो. याव्यतिरिक्त, यामुळे सागरी जहाजांच्या विम्याची जोखीमही वाढू शकते.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा रुपयाला मोठा फटका; ९२.१८ या विक्रमी नीचांकी पातळीवर
आयातीवरील अवलंबित्व
खाद्यतेलाच्या बाबतीत भारत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. सुधाकर देसाई यांचं म्हणणं आहे की, जागतिक पुरवठा साखळीतील अशा अडथळ्यांचा परिणाम देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतींवर निश्चित होतो आणि ते आता दिसू लागले आहे. सूर्यफूल आणि सोयाबीन तेलासाठी रेड सी आणि 'होर्मुज' या भागातील समस्यांमुळे, विशेषतः ब्लॅक सी द्वारे होणाऱ्या पुरवठ्यात व्यत्यय येतो. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानं भारतात आयात होणारं खाद्यतेल अधिक महाग पडत आहे.
दिल्लीत वाढले दर
देशाची राजधानी दिल्लीच्या घाऊक बाजारपेठेत सोमवार आणि मंगळवार दरम्यान खाद्यतेल, सुका मेवा इत्यादींच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. युद्धामुळे पुरवठा खंडित होण्याच्या आणि किमती आणखी वाढण्याच्या भीतीनं लोक जास्त प्रमाणात तेल खरेदी करत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. घाऊक बाजारातील या बदलाचा परिणाम किरकोळ किमतींवर दिसण्यासाठी अजून काही आठवड्यांचा काळ लागेल.
तर दुसरीकडे भारतात येणारा बहुतांश खजूर हा आखाती देशांतून येतो. त्यामुळे दिल्लीच्या बाजारपेठेत खजुराच्या किमती १० ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. इराण, अफगाणिस्तान आणि युएई सारख्या व्यापारी केंद्रांमधून पुरवठा होण्यास अडचणी येत असल्याने स्थानिक बाजारपेठेत खजुराचा तुटवडा निर्माण झालाय.
