ipl franchises income : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग जगभरात लोकप्रिय आहे. प्रत्येक क्रिकेट चाहता आयपीएल सीजनची उत्सुकतेने वाट पाहत असतो. जगभरात या लीगच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याच्या फ्रँचायझींच्या कमाईतही भरघोस वाढ झाली आहे. १० IPL फ्रँचायझींचा महसूल केवळ एका वर्षात दुप्पट झाला आहे. फ्रँचायझींचा एकूण महसूल २०२३ मध्ये ३,०८२ कोटी होता, जो २०२४ मध्ये वाढून ६,७९७ कोटी रुपये झाला आहे. टॉफलरने अलीकडेच ही माहिती प्रसिद्ध केली. कमाई वाढण्यामागे BCCI चा डिस्ने स्टार आणि वायकॉम 18 सोबत ४८,३९० कोटी रुपयांचा करार असल्याचे मानले जाते.
आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू १२ अब्ज डॉलरपर्यंत वाढली
अलीकडील ब्रँड फायनान्स अहवालानुसार, आयपीएलचे ब्रँड मूल्य २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये १३% वाढून १२ अब्ज डॉलर (१०,१६,६४,५८,८२,४००) झाले आहे, जे २००९ मध्ये २ अब्ज डॉलर होते. त्याचवेळी, चेन्नई सुपर किंग्स (CSK), मुंबई इंडियन्स (MI), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) या चार फ्रँचायझींनी ब्रँड व्हॅल्यूमध्ये १०० मिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.
टीम | आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एकूण महसूल | आर्थिक वर्ष २०२४ मध्ये नफा/तोटा |
गुजरात टायटन्स | ७७६ कोटी | - ५७ कोटी |
मुंबई इंडियन्स | ७३७ कोटी | १०९ कोटी |
कोलकाता नाइट रायडर्स | ६९८ कोटी | १७५ कोटी |
लखनौ सुपर जायंट्स | ६९५ कोटी | ५९ कोटी |
चेन्नई सुपर किंग्ज | ६७६ कोटी | २२९ कोटी |
पंजाब किंग्ज | ६६४ कोटी | २५२ कोटी |
राजस्थान रॉयल्स | ६६२ कोटी | १४२ कोटी |
सनरायझर्स हैदराबाद | ६५९ कोटी | एनए |
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | ६५० कोटी | २२१ कोटी |
दिल्ली कॅपिटल्स | ५८० कोटी | १९५ कोटी |
शाहरुख खानची बंपर कमाई
गेल्या आर्थिक वर्षात आयपीएल फ्रँचायझींच्या आर्थिक कामगिरीमध्ये मोठा बदल झाला, बहुतेक संघांनी त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असून नफा वाढवला आहे. यामध्ये गुजरात टायटन्स (GT), MI आणि CSK यांनी सर्वाधिक पैसा कमावला आहे. तर पंजाब किंग्स (PK) सर्वात जास्त नफा कमावणारी फ्रेंचाइजी म्हणून उदयास आली. शाहरुख खान आणि जय मेहता यांच्या सह-मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सुद्धा ३२२ कोटींवरून ६९८ कोटींचा महसूल कमावला आहे.