नवी दिल्ली : वर्ष २०२४ मध्ये भारतात उत्पादित करण्यात आलेल्या तब्बल एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आयफोनची निर्यात करण्यात आली आहे. एकूण १२.८ अब्ज डॉलर म्हणजेच १.०८ लाख कोटी रुपयांचे आयफोन भारतातून बाहेर पाठविण्यात आले आहेत. आदल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा ४२ टक्के जास्त आहे.
ॲपलने उत्पादन व सेवेत केलेल्या सुधारणेमुळे निर्यातीचा हा मोठा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. सध्या हे मूल्यवर्धन मॉडेलच्या आधारावर १५ ते २० टक्क्यांपर्यंत आहे. वर्षभरात आयफोनचे देशांतर्गत उत्पादन ४६ टक्के वाढून १.४८ लाख कोटींवर पोहोचले.
पीएलआय योजनेमुळे गती
भारत सरकारच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन लाभ (पीएलआय) योजनेमुळे स्मार्टफोन उत्पादनास गती मिळाली आहे. निर्यातीचे आकडे ‘फ्रेट ऑन बोर्ड’ (एफओबी) मूल्यावर आधारित आहे. त्यात जवळपास ६० टक्के किरकोळ विक्री किंमत (रिटेल मार्कअप) समाविष्ट नाही. पीएलआय योजनेत प्रोत्साहन लाभाचे मोजमाप करताना एफओबी मूल्य आधारभूत धरले जाते.