टाटा टेलीसर्विसेज (महाराष्ट्र) लिमिटेड (Tata Teleservices (Maharashtra) Limited - TTML) च्या शेअरमध्ये आज मंगळवारी जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीचे शेअर्स कामकाजाच्या अखेरिस १८.५३% नी वाढून ५४.११ रुपयांवर पोहोचले होते. परंतु दुसरीकडे, या वर्षात आतापर्यंत हा शेअर ३५ टक्क्यांपर्यंत कोसळला आहे.
कंपनीनं नुकतेच स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दूरसंचार विभाग (DoT), महाराष्ट्र लायसन्स्ड सर्व्हिस एरियाकडून (LSA) दोन डिमांड नोटीस मिळाल्या आहेत. या नोटिसा सब्सक्रायबर व्हेरिफिकेशन नियमांचे (ग्राहक ओळख पडताळणी) उल्लंघन करण्याशी संबंधित आहेत. कंपनीनं सांगितले आहे की, ते या नोटिसांचा आढावा घेत आहेत आणि पुढील कोणती पाऊले उचलावीत, याचं मूल्यांकन केले जात आहे.
नोटीस कधी आणि कशाबद्दल आहे?
कंपनीला या दोन्ही मागणी नोटीस ५ डिसेंबर २०२५ रोजी मिळाल्या. DoT चा आरोप आहे की, एप्रिल २००७ ते एप्रिल २०१२ या काळात कंपनीनं ग्राहक ओळख पडताळणीशी संबंधित नियमांचे योग्य प्रकारे पालन केलं नाही. याच आरोपाखाली DoT ने दंड लावला आहे. परवाना करारानुसार, कंपनीला प्रत्येक ग्राहकाची योग्य पडताळणी (उदा. केवायसी) सुनिश्चित करणं आवश्यक असतं.
DoT ने दोन वेगवेगळ्या काळासाठी कंपनीवर दोन दंड ठोठावले आहेत: १. ₹२९,३२,००० चा दंड एप्रिल २००७ ते मार्च २००९ या कालावधीसाठी आणि दुसरा ₹४,३९,३१,२०० चा दंड एप्रिल २००९ ते एप्रिल २०१२ या कालावधीसाठी ठोठावण्यात आलाय. एकूण सुमारे ₹४.६८ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. आरोप आहे की, या काळात सब्सक्रायबर व्हेरिफिकेशन नियमांचं पालन योग्य प्रकारे केलं गेलं नाही.
कंपनीवर काय परिणाम होईल?
कंपनीने म्हटले आहे की, सध्या या नोटिसांचा आर्थिक परिणाम केवळ दंडाच्या मर्यादेपर्यंतच राहील. कंपनी सध्या कागदपत्रांची तपासणी करत आहे आणि पुढील कायदेशीर किंवा प्रक्रियात्मक पावलं उचलायची याचा निर्णय नंतर घेईल. कंपनीनं सेबीच्या नियमांनुसार संपूर्ण माहिती वेळेवर एक्सचेंजला दिली आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
