एकेकाळी देशातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप असलेल्या एडटेक कंपनी बायजूच्या (Byju's) अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दोन वर्षांत कंपनीचं मूल्यांकन २२ अब्ज डॉलर्सवरून २५ कोटी डॉलर्स इतकं घसरलं आहे. दरम्यान, कंपनीच्या बड्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांची कंपनीतून बाहेर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी बायजूच्या मूळ कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस पाठवून एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंगची मागणी केली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाची पुनर्रचना आणि कंपनीच्या नेतृत्वात बदल यावर चर्चा व्हायला हवी, असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या, बायजूच्या बोर्डात बायजू रवींद्रन, त्याचा भाऊ रिजू रवींद्रन आणि पत्नी दिव्या गोकुलनाथ यांचा समावेश आहे. दरम्यान, अमेरिकेतील बायजूसच्या एका युनिटनं अमेरिकेत दिवाळखोरीच्या कारवाईसाठी अर्ज केला आहे. बायजूसच्या अल्फा युनिटची मालमत्ता ५० कोटी डॉलर्स ते १ अब्ज डॉलर्स दरम्यान आहे.
बायजूच्या गुंतवणूकदारांमध्ये जनरल अटलांटिक, पीक-१५ पार्टनर्स, सोफिना, चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्ह, आऊल आणि सँड्स यांचा समावेश आहे. एकूणच त्यांची बायजूमध्ये सुमारे ३० टक्के भागीदारी आहे. बायजूच्या भागधारकांच्या एका ग्रुपनं जुलै आणि डिसेंबरमध्ये बोर्ड बैठक बोलावण्याची विनंती केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. कंपनीची सद्यस्थिती लक्षात घेता आम्ही तिच्या भविष्याबद्दल खूप चिंतेत आहोत. कंपनीचं सध्याचं नेतृत्व आणि संचालक मंडळ कंपनीचं व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरलं आहे, असं बायजूसच्या शेअरधारकांनी गुरुवारी एका निवेदनाद्वारे म्हटलं. बायजू दीर्घकाळापासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून तिची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
कंपनीला मोठा तोटा
बायजूच्या मूळ कंपनीला २०२२ या आर्थिक वर्षात ८,२४५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर कंपनीने अद्याप २०२३ च्या आर्थिक वर्षाची माहिती जाहीर केलेली नाही. मणिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुपचे अध्यक्ष रंजन पै आकाश इन्स्टिट्यूटचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनल्याची बातमी अलीकडेच आली. बायजूसची मूळ कंपनी थिंक अँड लर्ननं २०२१ मध्ये आकाश इन्स्टिट्यूट ९५ कोटी डॉलर्सना खरेदी केले होते.