स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव, सुवर्ण बाजार असोसिएशन -
गेल्या चार वर्षात सोन्याचे भाव ४७ हजार रुपयांवरून एक लाख २३ हजार रुपयांवर पोहोचले आहेत, तर चांदीचे भाव ६३ हजार रुपयांवरून एक लाख ६९ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. या चार वर्षात सोन्यातील गुंतवणुकीतून १५७ तर चांदीतील गुंतवणुकीतून १६९ टक्के परतावा मिळाला आहे. वर्षनिहाय परताव्याचे प्रमाण पाहिले तर दरवर्षाचा आलेख चढताच आहे.
भारतीयांना विशेषत: महिला वर्गात सुरुवातीपासूनच सुवर्ण अलंकारांची मोठी ‘क्रेझ’ आहे. त्यातच सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही सोने-चांदी खरेदीकडे कल अधिकच वाढू लागल्याने भावही दररोज वाढत आहे. कोरोना काळापासून तर सोने-चांदीच्या भावात झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना पाठोपाठ रशिया व युक्रेन तसेच इस्रायल व हमास यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. त्यानंतर अमेरिकेत सुरू झालेल्या ट्रम्प पर्वामुळे अख्खे जग ढवळून निघाले.
या चारही देशातील संघर्ष काळात सोने-चांदीचे भाव ज्या प्रमाणात वाढले त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात भाववाढ अमेरिकेतील स्थितीमुळे होत आहे. कोरोना काळात सोन्यातून आठ टक्के परतावा मिळाला तर चांदीतून परतावा मिळण्याऐवजी भावात काहीसी घसरण झाली होती. सन २०२२नंतर रशिया व युक्रेन संघर्षावेळी सोन्यातून १५ तर चांदीतून १९ टक्के परतावा मिळाला होता. इस्त्रायल व हमास युद्धावेळीदेखील सोन्यातून ३० टक्के तर चांदीतून ३२ टक्के परतावा मिळाला.
आता गेल्या वर्षभरात अमेरिकन फेडरल बँकेच्या कोलमडलेल्या स्थितीमुळे अमेरिकन नागरिक सोन्याकडे वळले. त्यामुळे गेल्या वर्षभरात सोन्यातून ६३ टक्के तर चांदीतून ८४ टक्के परतावा मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या टॅरिफमुळे सर्वच देश धास्तावले. यामुळे विविध देशांकडून सोने-चांदीमध्ये अधिक गुंतवणूक केली जात आहे. परिणामी, त्याचे भाव झपाट्याने वाढत आहेत.
...तर दोन लाखांपर्यंत भाव -
सन १९२० मधील जागतिक मंदीनंतर गेल्या १०५ वर्षांत सोने-चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढतच गेले आहेत. येत्या दोन वर्षात सोने दोन लाख तर चांदी दोन लाख ५० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. गुंतवणूकदारांसाठी हा ‘सुवर्ण’ काळ ठरेल.
गेल्या चार वर्षांतील सोने-चांदीचे भाव
दिनांक सोने चांदी
११ ऑक्टोबर २०२१ ४७,९०० ६३,३००
११ ऑक्टोबर २०२२ ५१,३०० ५९,०००
११ ऑक्टोबर २०२३ ५८,८०० ७०,०००
११ ऑक्टोबर २०२४ ७६,००० ९२,०००
११ ऑक्टोबर २०२५ १,२३,००० १,६९,०००
सोने भाववाढीचा वेग आणि कालावधी
६० ते ७० हजार एक वर्ष
७० ते ८० हजार ९ महिने १८ दिवस
८० ते ९० हजार दोन महिने ९ दिवस
९० हजार ते १,००,००० दोन महिने १४ दिवस
१,००,००० ते १,१०,००० दोन महिने २८ दिवस
१,१०,००० ते १,२१,००० २७ दिवस४ एप्रिल २०२३
वर्षनिहाय असा मिळाला परतावा (दरवर्षाच्या ११ ऑक्टोबरच्या भावानुसार) -
वर्ष सोने चांदी
२०२१ ते २०२२ ८% -८%
२०२२ ते २०२३ १५% १९%
२०२३ ते २०२४ ३०% ३२%
२०२४ ते २०२५ ६३% ८४%