Infosys Freshers : यंदा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात एआयने आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी केल्या. मात्र, आता याच एआयच्या जोरावर नोकऱ्यांची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने नवीन अभियंत्यांसाठी पगाराचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. कंपनीने आपल्या 'स्पेशलाइज्ड टेक्नॉलॉजी' विभागासाठी वार्षिक २१ लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजची घोषणा केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले असून, यामुळे इन्फोसिस ही देशातील फ्रेशर्सना सर्वाधिक पगार देणारी आयटी कंपनी ठरली आहे.
'ऑफ-कॅम्पस' भरतीचा बिगुल
२०२५ मध्ये पदवीधर होणाऱ्या इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिसने विशेष 'ऑफ-कॅम्पस' भरती मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये निवडक तांत्रिक भूमिकांसाठी वार्षिक ७ लाख ते २१ लाख रुपयांपर्यंतचे पगार देऊ केले आहेत. कंपनीचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर शाजी मॅथ्यू यांनी स्पष्ट केले की, कंपनीने आता 'AI-First' धोरण अवलंबले असून त्यासाठी सखोल तांत्रिक ज्ञान असलेल्या तरुणांची गरज आहे.
कोणत्या पदासाठी किती पगार?
- स्पेशालिस्ट प्रोग्रामर L3 (ट्रेनी) : २१ लाख रुपये वार्षिक.
- स्पेशालिस्ट प्रोग्रामर L2 (ट्रेनी) : १६ लाख रुपये वार्षिक.
- स्पेशालिस्ट प्रोग्रामर L1 (ट्रेनी) : ११ लाख रुपये वार्षिक.
- डिजिटल स्पेशालिस्ट इंजिनीअर (ट्रेनी) : ७ लाख रुपये वार्षिक.
ही पदे कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीसह ECE आणि EEE सारख्या सर्किट ब्रांचेसच्या BE, BTech, ME, MTech, MCA आणि MSc पदवीधरांसाठी उपलब्ध आहेत.
वाचा - UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
यावर्षी २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य
इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आधीच १२,००० फ्रेशर्सना नोकरी दिली आहे. कंपनीने या वर्षासाठी एकूण २०,००० फ्रेशर्सना कामावर घेण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या तिमाही निकालांनुसार कंपनी या लक्ष्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. एकट्या सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीत कंपनीने आपल्या ताफ्यात ८,२०३ नवीन कर्मचाऱ्यांची भर घातली आहे.
