Interglobe Aviation : देशातील सर्वात मोठी एअरलाइन 'इंडिगो'च्या गलथान कारभारामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. पण, याचा फटका फक्त प्रवाशांनाच नाही तर शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांनाही बसला आहे. इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनच्या स्टॉकला गेल्या काही दिवसांत मोठा झटका बसला आहे. गेल्या ८ ट्रेडिंग दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १७.६६% ची मोठी घसरण दिसून आली आहे.
पायलटसाठी नवीन फ्लाईट ड्युटी टाइम नियम लागू केल्यानंतर एअरलाइनला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. यामुळे इंडिगोला एकाच दिवसात १,००० हून अधिक फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या, जो भारतीय विमान वाहतूक इतिहासातील सर्वात मोठा आकडा आहे. २७ नोव्हेंबर रोजी ५,९१७ रुपयांवर असलेला हा शेअर आता (मंगळवारी) ४,८७२ रुपयांपर्यंत खाली आला आहे. या घसरणीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घट झाली आहे.
म्युच्युअल फंड्सलाही मोठा फटका
या स्टॉक घसरणीमुळे इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये मोठी गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंड्सनाही जबरदस्त फटका बसला आहे. ऑक्टोबरपर्यंत, ४३ म्युच्युअल फंड हाऊसेसकडे इंटरग्लोब एव्हिएशनचे सुमारे ६ कोटी शेअर्स होते, ज्याचे बाजार मूल्य सुमारे ३८,२२६ कोटी रुपये होते. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड या यादीत अव्वल आहे, त्यांच्याकडे १.१९ कोटींहून अधिक शेअर्स होते, ज्यांचे मूल्य सुमारे ६,७१८ कोटी रुपये होते. याव्यतिरिक्त एसबीआय म्युच्युअल फंड (८८.२२ लाख शेअर्स) आणि HDFC म्युच्युअल फंड (७८.०५ लाख शेअर्स) यांचा क्रमांक लागतो.
| म्युच्युअल फंड हाऊस | अंदाजित शेअर्स (लाख) |
| ICICI प्रुडेन्शियल | ११९.०० |
| SBI म्युच्युअल फंड | ८८.२२ |
| HDFC म्युच्युअल फंड | ७८.०५ |
| कोटक म्युच्युअल फंड | ५२.४१ |
| UTI म्युच्युअल फंड | ३९.०४ |
'डीजीसीए'च्या नोटीसवर कंपनीचे स्पष्टीकरण
इंडिगोमध्ये सुरू असलेल्या प्रचंड ओपरेशनल समस्यांमुळे नागरिक उड्डयन महासंचालनालयाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. डीजीसीएला दिलेल्या उत्तरात इंडिगोने मान्य केले की, *पायलटांच्या ड्युटी नियमांमधील बदल आणि काही छोट्या तांत्रिक समस्यांमुळे फ्लाईट्स रद्द आणि विलंबित झाल्या.
वाचा - डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
गेल्या आठवड्यात इंडिगोच्या २००० हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्या, ज्यामुळे प्रवाशांना आणि एअरलाइनला मोठे नुकसान झाले. जिओब्लॅकरॉक, कॅपिटलमाइंड आणि युनिफायसारख्या नवीन म्युच्युअल फंडांमध्येही हा स्टॉक समाविष्ट आहे, त्यामुळे ही घसरण व्यापक गुंतवणूकदारांवर परिणाम करत आहे.
