Indigo Sale: जर तुम्ही येत्या काळात विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी इंडिगोनं प्रवाशांसाठी एक मोठी ऑफर जाहीर केली आहे. सोमवारी, कंपनीनं त्यांची नवीन ऑफर, फ्लाइंग कनेक्शन सेलची घोषणा केली, जी १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालेल. या सेल अंतर्गत, प्रवासी १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यानच्या प्रवासासाठी स्वस्त तिकिटं बुक करू शकतील. चला जाणून घेऊया काय आहे ही ऑफर.
किती असू शकतं भाडं?
इंडिगोनं दिलेल्या माहितीनुसार या ऑफर अंतर्गत देशांतर्गत एकेरी प्रवासाचं भाडं ₹२,३९० पासून सुरू होईल, तर आंतरराष्ट्रीय प्रवासाचं भाडे ₹८,९९० पासून सुरू होईल. ही ऑफर प्रवाशांना देशांतर्गत आणि परदेशात परवडणारे तसंच सोयीस्कर प्रवास प्रदान करेल. कंपनीच्या मते, इंडिगो या सेलद्वारे ८,००० हून अधिक शहरी जोड्या प्रवाशांना देत आहे. या नेटवर्कमध्ये ९०+ देशांतर्गत आणि ४०+ आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा समावेश आहे. ही ऑफर विशेषतः मल्टी सिटी किंवा कनेक्टिंग फ्लाइटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आहे.
कोणत्या मार्गासाठी किती भाडं?
एअरलाइनने शहरनुसार भाड्यांची यादी देखील जाहीर केली आहे. देशांतर्गत मार्गांमध्ये, कोची-शिवमोगा मार्गासाठी सर्वात कमी भाडे फक्त ₹२,३९० इतके निश्चित केलं आहे. याव्यतिरिक्त, लखनऊ-रांची आणि पटना-रायपूर मार्गांसाठी तिकिटांचं भाडं ₹३,५९० पासून सुरू होतं. कोची-विशाखापट्टणमचे भाडे ₹४,०९०, जयपूर-रायपूर ₹४,१९० आणि अहमदाबाद-प्रयागराज ₹४,४९० आहे. प्रवाशांना पटना-इंदूरचं भाडं ₹४,५९०, कोची-भुवनेश्वर आणि जयपूर-भुवनेश्वरचं भाडं ₹४,६९० आणि लखनऊ-भुवनेश्वरचं तिकीट ₹४,७९० मध्ये मिळू शकते.
आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी देखील आकर्षक तिकीट दर जाहीर करण्यात आले आहे. कोची ते सिंगापूरचं भाडं ₹८,९९०, अहमदाबाद ते सिंगापूरचं भाडं ₹९,९९० आणि जयपूर ते सिंगापूरचं भाडं ₹१०,१९० निश्चित करण्यात आलं आहे. तर, लखनौ ते हनोईचं भाडं ₹१०,९९०, जयपूर ते हनोई ११,३९० आणि अहमदाबाद ते हनोई ११,७९० असेल. पाटणा ते सिंगापूरचं भाडे ₹११,७९०, लखनौ ते सिंगापूर ११,८९०, पटना ते हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम) १३,६९० आणि जयपूर ते आम्सटरडॅम (नेदरलँड्स) १५,५९० निश्चित करण्यात आलं आहे.