Vembu vs Pramila Srinivasan : भारतातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी 'जोहो'चे संस्थापक श्रीधर वेम्बू सध्या आपल्या कौटुंबिक वादामुळे जागतिक स्तरावर चर्चेत आले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया न्यायालयाने एका घटस्फोटाच्या खटल्यात वेम्बू यांना चक्क १.७ अब्ज डॉलर (सुमारे १५,३०० कोटी रुपये) किमतीचे रोखे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जर हा घटस्फोट झाला, तर तो भारताच्या इतिहासातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक ठरू शकतो.
कोर्टाचे ताशेरे आणि मालमत्ता हस्तांतरणावर बंदी
'द न्यूज मिनिट'ने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी २०२५ मध्ये कॅलिफोर्निया हायकोर्टाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. श्रीधर वेम्बू यांनी त्यांच्या पत्नी प्रमिला श्रीनिवासन यांच्या मालकी हक्कांकडे दुर्लक्ष करून आणि कायद्याचे उल्लंघन करून सामुदायिक मालमत्तेत फेरफार केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. जोहो समूहातील कोणत्याही मोठ्या कॉर्पोरेट बदलांवर तूर्तास बंदी घालण्यात आली असून, कंपनीच्या देखरेखीसाठी एक 'रिसिव्हर' नियुक्त करण्यात आला आहे.
काय आहे 'जोहो'च्या शेअर्सचा वाद?
प्रमिला श्रीनिवासन यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यायालयात गंभीर दावे केले होते. वेम्बू यांनी अमेरिकेतील 'जोहो कॉर्पोरेशन'मधील आपल्या शेअर्सचा मोठा हिस्सा आपल्या एका सहकाऱ्याच्या नावे गुपचूप ट्रान्सफर केल्याचा आरोप प्रमिला यांनी केला आहे. प्रमिला यांच्या मते, लग्न टिकले तोपर्यंत वेम्बू यांनी कंपनी आपली असल्याचे सांगितले. मात्र, घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यावर त्यांनी आपला हिस्सा केवळ ५ टक्के असल्याचा दावा केला, तर उर्वरित ८० टक्क्यांहून अधिक हिस्सा त्यांच्या भावंडांकडे असल्याचे सांगितले.
'मी करिअरसाठी त्यांना पाठिंबा दिला' – प्रमिला श्रीनिवासन
प्रमिला श्रीनिवासन या स्वतः एक नामांकित शिक्षणतज्ज्ञ, उद्योजिका आणि हेल्थ-टेक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी नमूद केले की, श्रीधर वेम्बू यांनी आपली नोकरी सोडून व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे यासाठी त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून त्यांना पाठिंबा दिला होता. अशा परिस्थितीत ३० वर्षांच्या संसारानंतर झालेली ही फसवणूक धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रमिला यांनी 'द ब्रेन फाऊंडेशन' या ऑटिझम रिसर्चसाठी काम करणाऱ्या संस्थेचीही स्थापना केली आहे.
वाचा - २० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
वेम्बू यांची संपत्ती आणि दावा
फोर्ब्सच्या २०२५ च्या यादीनुसार, श्रीधर वेम्बू आणि त्यांच्या भावंडांची एकूण संपत्ती ६ अब्ज डॉलर इतकी आहे. वेम्बू यांनी प्रमिला यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "मी जोहोचा सीईओ असलो तरी, कंपनीत माझी भागीदारी सुरुवातीपासूनच केवळ ५ टक्के राहिली आहे," असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. २०१९ मध्ये वेम्बू अमेरिकेतून भारतात परतले होते आणि २०२१ पासून ही घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.
