India's Trade Outlook: दक्षिण आशियाच नव्हे, तर जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल ठरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर 25% आणि रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त 25%, असा एकूण 50% शुल्क लादल्यामुळे, भारताची अर्थव्यवस्था दबावाखाली येईल, अशी भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्याचे उलट चित्र समोर आले आहे.
टॅरिफचा अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही
एसबीआयच्या रिसर्च अहवालानुसार, अमेरिकन टॅरिफचा भारताच्या GDP वर नगण्य प्रभाव दिसून आला आहे. उलट, जागतिक अस्थिरतेनंतरही भारताच्या निर्यातीत वाढ नोंदवली गेली आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल-सप्टेंबर 2025-26 या कालावधीत भारताचा माल निर्यात आकडा 220 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 214 अब्ज डॉलर्स होता. म्हणजेच या निर्यातीत 2.9% वाढ नोंदवली गेली आहे.
अमेरिकेतील निर्यातीत वाढ
अमेरिकेच्या उच्च टॅरिफनंतरही भारताचा अमेरिकेकडे निर्यातीत 13% वाढ, म्हणजेच 45 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मात्र, सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेतील निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 12 टक्क्यांनी कमी झाली. अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिका भारताची प्रमुख निर्यात बाजारपेठ राहिली आहे, परंतु जुलै 2025 नंतर अमेरिकेतील एकूण निर्यातीत लक्षणीय घट नोंदवण्यात आली. सप्टेंबर 2025 मध्ये ही घट सुमारे 15 टक्क्यांपर्यंत पोहोचली. शिवाय, अमेरिकेतील सागरी उत्पादने आणि मौल्यवान दगडांच्या निर्यातीतही लक्षणीय घट झाली.
नवीन बाजारपेठांकडे वाटचाल
दुसरीकडे, भारताने आपली निर्यात युएई, चीन, व्हिएतनाम, जपान, हाँगकाँग, बांगलादेश, श्रीलंका आणि नायजेरियासारख्या देशांमध्ये हलवली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अमेरिकेतील उच्च करांमुळे कापड, दागिने आणि कोळंबी यासारख्या भारतीय उत्पादनांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, सरकारने निर्यातदारांना मदत करण्यासाठी 45,000 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे, ज्यामध्ये 20,000 कोटी रुपयांची क्रेडिट गॅरंटी देखील समाविष्ट आहे.
