Inox Solar :भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. INOXGFL Group अंतर्गत असलेल्या Inox Solar या भारतीय कंपनीने चीनच्या अग्रगण्य सौर ऊर्जा कंपनी Longi Green Energy Technology सोबत ₹7,000 कोटींचा करार केला आहे. या कराराअंतर्गत पुढील तीन वर्षांमध्ये Inox Solar, Longi ला 5 गीगावॅट (GW) क्षमतेचे सोलर मॉड्यूल्स पुरवणार आहे.
हा करार केवळ भारताच्या सौर उद्योगासाठी मोठी झेप नसून, जग आता भारताच्या उत्पादन क्षमतेवर आणि ‘मेड इन इंडिया’ तंत्रज्ञानावर विश्वास ठेवत आहे, याचा पुरावा आहे. चीनसारखा तंत्रज्ञानात अग्रगण्य असलेला देशही यात सहभागी झाला आहे.
सौर मॉड्यूल उत्पादनात झपाट्याने वाढ
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, चीनची Longi कंपनी भारतातील प्रकल्पांसाठी लागणारे मॉड्यूल्स Inox Solar कडून खरेदी करेल. या कराराअंतर्गत Longi आपले तांत्रिक कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानक Inox ला उपलब्ध करून देईल, ज्यामुळे भारतीय उत्पादने जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील. भारत सध्या सौर मॉड्यूल्सच्या स्थानिक उत्पादनाला गती देत आहे, जेणेकरून चीनसारख्या देशांवरील आयात अवलंबित्व कमी करता येईल.
Inox Solar चा विस्तार आणि नवे प्रकल्प
Inox Solar ने नुकतेच अहमदाबादजवळ बावळा (Bavla) येथे एक अत्याधुनिक सोलर मॉड्यूल उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पाची क्षमता 1.2 GW आहे. पुढील टप्प्यात ती वाढवून 3 GW करण्यात येणार आहे. कंपनी याशिवाय ओडिशातील ढेंकनाल येथे आणखी एक मोठा सोलर सेल आणि मॉड्यूल प्लांट उभारत आहे, ज्याची एकूण क्षमता 4.8 GW असेल. या प्रकल्पांमुळे भारत सौर उत्पादन क्षेत्रात एक महत्त्वाचा जागतिक केंद्रबिंदू बनू शकतो.
IPOची तयारी आणि भविष्यातील योजना
Inox Solar ची मूळ कंपनी Inox Clean Energy लवकरच IPO (Initial Public Offering) घेऊन पब्लिक लिस्टिंग करण्याच्या तयारीत आहे. हा IPO या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे. सध्या भारतातील सोलर मॉड्यूल उत्पादन क्षमता 100 GW पेक्षा अधिक असून, सोलर सेल उत्पादन क्षमता 27 GW आहे. ती या वर्षाअखेरीस 40 GW पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
