Share Market : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजाराच्या तेजीला शुक्रवारी ब्रेक लागला. प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स ६९४ अंकांनी घसरून ८१,३०६ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी २१४ अंकांनी घसरून २४,८७० च्या पातळीवर बंद झाला. या घसरणीमुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण
या घसरणीचा सर्वाधिक फटका निफ्टी ५० मधील कंपन्यांना बसला. यात एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये २.४२% ची मोठी घसरण झाली. याशिवाय, ग्रासिम इंडस्ट्रीज, अदाणी एंटरप्रायजेस, अल्ट्राटेक सिमेंट्स आणि हीरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्येही लक्षणीय घसरण झाली.
स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्येही नकारात्मकता
केवळ प्रमुख निर्देशांकांमध्येच नव्हे, तर स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्समध्येही घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप इंडेक्स ०.२३% आणि स्मॉलकॅप इंडेक्स ०.३५% ने घसरला. या घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४५६.३ लाख कोटींवरून ४५४ लाख कोटींवर आले. यामुळे एकाच सत्रात गुंतवणूकदारांना २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले.
चढ-उतारांचे चित्र
शुक्रवारच्या घसरणीतही काही सेक्टर्सनी चांगली कामगिरी केली. यात निफ्टी मीडिया ०.९५%, निफ्टी फार्मा ०.३९% आणि निफ्टी इंडिया डिफेन्स ०.२९% ने वाढले. दुसरीकडे, निफ्टी मेटलमध्ये १.२५% ची सर्वाधिक घसरण झाली. याशिवाय, पीएसयू बँक, निफ्टी बँक, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी रियल्टी मध्येही मोठी घसरण झाली.
वाचा - आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
टॉप गेनर आणि लूजर्स
निफ्टी ५० च्या सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्समध्ये, महिंद्रा अँड महिंद्रा सर्वाधिक ०.८३ टक्के वाढले. त्यानंतर, मारुती सुझुकी ०.४९ टक्के, भारती एअरटेल ०.१८ टक्के, भारत इलेक्ट्रॉनिक्स ०.१८ टक्के, टायटन कंपनी ०.१३ टक्के वाढले.