Share Market Today: भारतीय शेअर बाजारात आज, (शुक्रवार, १८ जुलै) गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. आज बाजाराची सुरुवातच नकारात्मक झाली आणि दिवसभर घसरण सुरू राहिली. याचा परिणाम असा झाला की, बीएसई सेन्सेक्स ५०१.५२ अंकांनी (०.६१%) घसरून ८१,७५७.७३ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी १४३.०५ अंकांनी (०.५७ %) घसरून २४,९६८.४० वर स्थिरावला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना सुमारे २.५७ लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. जागतिक बाजारपेठेतील कमकुवत संकेत आणि अॅक्सिस बँकेसह अनेक कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत निकालांमुळे बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला.
गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटींचे नुकसान
आज १८ जुलै रोजी, बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४५८.३० लाख कोटी रुपयांवर घसरले. काल, १७ जुलै रोजी हे बाजार भांडवल ४६०.८७ कोटी रुपये होते. याचा अर्थ असा की, फक्त एका दिवसात बीएसईवरील कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे २.५७ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज एवढ्या मोठ्या रकमेची घट झाली.
कोणते शेअर्स वाढले आणि कोणते घसरले?
सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढलेले ५ समभाग
आज सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ७ समभाग वाढीसह बंद झाले. यामध्ये बजाज फायनान्सच्या समभागांनी सर्वाधिक १.९४% वाढ नोंदवली. याशिवाय, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक आणि इन्फोसिसचे शेअर्स ०.२४ टक्क्यांपासून ते १.६६ टक्क्यांपर्यंत वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्समधील सर्वाधिक घसरलेले ५ समभाग
सेन्सेक्समधील उर्वरित २३ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. यामध्ये अॅक्सिस बँक सर्वाधिक ५.२४ टक्क्यांनी घसरली. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल, HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांसारखे मोठे शेअर्स १.४४% ते २.३४% पर्यंत घसरले.
एकूण २,३९० शेअर्स घसरले!
आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या वाढलेल्या शेअर्सपेक्षा खूप जास्त होती. एकूण ४,२०८ शेअर्सपैकी, केवळ १,६६० शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २,३९० शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. १५८ शेअर्स कोणत्याही चढ-उतारांशिवाय स्थिर राहिले. आजच्या व्यवहारात, १४३ शेअर्सने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर ४५ शेअर्सने ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.
वाचा - रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
गुंतवणूकदारांचे लक्ष आता सोमवार, २१ जुलै रोजी जाहीर होणाऱ्या काही मोठ्या कंपन्यांच्या तिमाही निकालांवर असेल. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या दिवशी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत, ज्यामुळे बाजाराची पुढील दिशा ठरू शकते.