IOCL and BPCL Oil Reserves : अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्या 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड' (IOCL) आणि 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' (BPCL) यांच्या हाती खजिना लागला आहे. या कंपन्यांनी अबू धाबीतील एका जमिनीवरील ऑईल ब्लॉकमध्ये कच्च्या तेलाचे नवीन साठे सापडल्याची घोषणा केली आहे. भारतासाठी ही एक मोठी बाब आहे, कारण यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल आणि परदेशातील तेल उत्पादनात भारताचा वाटा वाढेल.
हे तेलाचे साठे 'यूर्जा भारत प्रायव्हेट लिमिटेड' (UBPL) नावाच्या कंपनीला मिळाले आहेत. UBPL ही IOC आणि BPCL ची एक्सप्लोरेशन व प्रॉडक्शन कंपनी 'भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड' (BPRL) यांचा ५०-५० टक्क्यांचा संयुक्त उपक्रम आहे. आयओसीनं दिलेल्या माहितीनुसार, यूबीपीएलला २०२४ च्या सुरुवातीला पहिल्यांदा कच्च्या तेलाचे साठे सापडल्यानंतर आता दुसऱ्या शोध विहिरीतही कच्चे तेल मिळाले आहे. UBPL ला सर्वात आधी याच वर्षाच्या सुरुवातीला 'XN-76' नावाच्या शोध विहिरीत कच्चं तेल सापडलं होतं. आता जो नवीन साठा सापडला आहे, तो त्याच भागातील 'XN-79 02S' या दुसऱ्या शोध विहिरीच्या खोदकाम आणि चाचणी दरम्यान मिळाला आहे.
मार्च २०१९ मध्ये मिळाले होते अधिकार
संयुक्त उपक्रम UBPL ला मार्च २०१९ मध्ये अबू धाबीमधील 'ऑनशोर ब्लॉक १' मध्ये शोध घेण्याचे अधिकार मिळाले होते. हा ब्लॉक सुमारे ६,१६२ चौरस किलोमीटरचा असून UBPL कडे याचे १०० टक्के अधिकार आहेत. या शोधाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कंपन्यांनी अंदाजे १६६ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली असून हा टप्पा आता पूर्ण झाला आहे.
आयओसीनं सांगितलं की, पहिला तेलाचा साठा 'शिलाईफ' (Shilaif) नावाच्या क्षेत्रातील XN-76 विहिरीत सापडला होता. या विहिरीत यशस्वीरित्या हायड्रो-फ्रॅक्चरिंग (पाणी आणि रसायनांद्वारे खडक फोडून कच्चं तेल काढणं) केल्यानंतर शिलाईफ थरातून तेल पृष्ठभागावर आलं.
येथे सापडला दुसरा साठा
कच्च्या तेलाचा दुसरा साठा 'XN-79 02S' शोध विहिरीच्या चाचणी दरम्यान मिळाला आहे. या विहिरीतून 'हबशान' नावाच्या जलाशयातून कच्चं तेल निघालं आहे. या ब्लॉकच्या हबशान जलाशयात सापडलेला हा पहिलाच तेलाचा साठा आहे. आता या दोन्ही तेलाच्या साठ्यांचे मूल्यमापन केलं जाईल, जेणेकरून ते व्यावसायिकदृष्ट्या किती फायदेशीर आहेत आणि त्यांचा विकास केला जाऊ शकतो का, हे निश्चित करता येईल.
भारताला काय फायदा होणार?
कंपन्यांच्या मते, हे दोन्ही साठे IOC आणि BPCL साठी एक महत्त्वाचा टप्पा आहेत, कारण त्या आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल उत्पादन क्षेत्रात काम करत आहेत. या शोधांमुळे भारताची ऊर्जा सुरक्षा दीर्घकाळासाठी मजबूत होईल. उत्पादन सवलत करारांतर्गत या ब्लॉकमधून निघणाऱ्या तेलावर UBPL चे अधिकार आहेत. कंपन्यांनी म्हटलंय की, यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षा उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल.
