Indian Currency : गेल्या वर्षभरात भारतीय चलन रुपयाने अमेरिकी डॉलरसमोर अक्षरशः लोटांगण घातलं आहे. बुधवारी रुपयाने नवा विक्रमी नीचांक गाठला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया प्रथमच ९० च्या खाली घसरून ९०.१४ या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हा केवळ एक आकडा नसून, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. याचा थेट सर्वसामान्या लोकांनाही फटका बसणार आहे.
रुपया का घसरत आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केल्यापासून अमेरिका आणि भारत यांच्या व्यापार करार होण्याची चर्चा होत आहे. मात्र, अद्याप यात काहाही प्रगती झाल्याचे दिसत नाही. याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या भावनांवर झालेला पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षभरापासून भारतीय बाजारातून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत आहेत, ज्यामुळे डॉलरची मागणी वाढत आहे.
ऑक्टोबर महिन्यात भारताच्या निर्यातीत १२% घट झाली आहे, जी मुख्यत्वे अमेरिकेला होणाऱ्या कमी निर्यातीमुळे झाली आहे.
आगामी यूएस फेडरल रिझर्व्हचा निर्णय रुपयाची पुढील दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
अर्थव्यवस्थेसाठी धोका
रुपयाचे मूल्य वेगाने घसरणे हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत नाही, विशेषतः भारतासारख्या देशासाठी. भारत ८०% पेक्षा जास्त कच्चे तेल आयात करतो. डॉलर महाग झाल्यामुळे पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यासाठी जास्त रक्कम खर्च करावी लागेल. याचा थेट परिणाम वाहतूक, दळणवळण खर्च आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होईल, ज्यामुळे देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढू शकते. २०२५ च्या सुरुवातीपासूनच भारतीय चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५ टक्क्यांहून अधिक तुटले आहे.
स्वातंत्र्यानंतर रुपयाची वाटचाल
- स्वातंत्र्याच्या वेळी (१९४७) : रुपया थेट डॉलरशी जोडलेला नव्हता. परंतु, तेव्हा १ डॉलरची किंमत अंदाजे ३.३ रुपये होती.
- १९६६ चा काळ : दुष्काळ आणि पेमेंट शिल्लक कमी झाल्यामुळे १९६६ मध्ये रुपयाचे मूल्य ७.५० रुपये प्रति डॉलरवर घसरले.
- उदारीकरण (१९९०-९१) : गंभीर बाह्य संकटामुळे रुपया १७.५ रुपयांवरून थेट २२.७ रुपयांवर गेला.
- २०१३ चा 'टेपर टँट्रम' : या काळात रुपया ५६.६ रुपयांपर्यंत पोहोचला होता.
वाचा - लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
तज्ज्ञांनी आधीच रुपया ९० चा टप्पा ओलांडेल असा इशारा दिला होता, पण इतकी जलद घसरण अपेक्षित नव्हती. नजीकच्या काळात रुपयावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.
