Indian Railways : जर तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करत असाल आणि प्रत्येक वेळी लोअर बर्थ म्हणजेच खालच्या सीटसाठी तुमची गैरसोय होत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे! भारतीय रेल्वेने लोअर बर्थ आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
आता ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दिव्यांग प्रवाशांना महत्त्व देत, सीट वाटप प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, प्रवाशांमध्ये सीटवर बसणे आणि झोपण्याच्या वेळेवरून होणारा वाद संपुष्टात आणण्यासाठी रेल्वेने वेळ निश्चित करून दिली आहे.
या प्रवाशांना लोअर बर्थमध्ये प्राथमिकता
रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, आता खालील प्रवाशांना लोअर बर्थ सीट वाटपात सर्वाधिक महत्त्व दिले जाईल.
- ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग प्रवासी
- ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला: या महिला प्रवाशांसाठी ऑटोमॅटिक लोअर बर्थ वाटप करण्याची सुविधा सिस्टीममध्ये देण्यात आली आहे. म्हणजे, जर सीट रिक्त असेल तर सिस्टीम स्वतःहून लोअर बर्थ देईल.
- टीटीईला अधिकार : जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला अप्पर किंवा मिडल बर्थ मिळाली असेल आणि लोअर बर्थ रिक्त असेल, तर तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला ती सीट त्यांना हस्तांतरित करण्याचा अधिकार असेल.
लोअर बर्थ बुकिंग आता उपलब्धतेवर अवलंबून
ज्या प्रवाशांना लोअर बर्थ पसंत आहे, त्यांच्यासाठी रेल्वेने स्पष्ट केले आहे की, आता लोअर बर्थ केवळ उपलब्ध असल्यास बुक करता येईल. सिस्टीममध्ये "लोअर बर्थ ऑप्शन" तेव्हाच निवडता येईल, जेव्हा त्या वेळी रिकाम्या सीट्स उपलब्ध असतील.
झोपण्याची आणि बसण्याची वेळ निश्चित
आरक्षित डब्यात प्रवाशांना रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत झोपण्याची परवानगी असेल.
दिवसाच्या वेळी म्हणजेच सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत, सर्व प्रवाशांना सीटवर बसण्याची व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून कोणालाही गैरसोय होणार नाही.
साईड लोअर बर्थसाठी नवीन नियम
दिवसाच्या वेळी आरएसी प्रवासी आणि साईड अप्पर बर्थ वाला व्यक्ती एकत्र बसू शकतील.
मात्र, रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान, साईड अप्पर बर्थ असलेल्या व्यक्तीचा लोअर बर्थवर कोणताही दावा राहणार नाही.
RailOne ॲपमुळे बुकिंग झाले सोपे
रेल्वेने काही काळापूर्वी RailOne ॲप लॉन्च केले होते. हे ॲप प्रवाशांसाठी एक वन-स्टॉप सोल्युशन आहे. या ॲपद्वारे प्रवासी सीटची उपलब्धता, तिकीट बुकिंग आणि प्रवासाचे ट्रॅकिंग यासारखी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवू शकतात. लोअर बर्थ आरक्षणातही तांत्रिक सुधारणा केल्या गेल्या आहेत जेणेकरून बुकिंग प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये.
वाचा - आयुष्यभर शेअर बाजारातून पाण्यासारखा पैसा कमावला! पण, आता सातत्याने काढतायेत पैसा, काय आहे कारण?
रेल्वेचे हे सर्व बदल प्रवाशांना उत्तम, आरामदायक आणि निष्पक्ष अनुभव देण्यासाठी करण्यात आले आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना सोयीसुविधा तर मिळतीलच, पण रात्री झोपणे आणि दिवसा बसण्यावरून होणारे वादही संपुष्टात येतील, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.
