P&G Shailesh Jejurikar : प्रतिभावान भारतीयांनी कायमच जगाला अचंबित केलं आहे, आणि आता या यादीत आणखी एका मोठ्या नावाचा समावेश झाला आहे! अमेरिकन एफएमसीजी कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बलने भारतात जन्मलेल्या शैलेश जेजुरीकर यांची पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. जेजुरीकर १ जानेवारी २०२६ पासून या बहुराष्ट्रीय ग्राहकोपयोगी वस्तू कंपनीचे नेतृत्व करतील. प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) ही भारतीय बाजारपेठेत एरियल, टाइड, व्हिस्पर, जिलेट, अंबीपूर, पॅम्पर्स, पॅन्टीन, ओरल-बी, हेड अँड शोल्डर्स आणि विक्स सारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँडसह एक आघाडीची कंपनी आहे.
३६ वर्षांचा प्रवास.. सहाय्यक ब्रँड मॅनेजर ते CEO पर्यंत
सिनसिनाटी, ओहायो येथील कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, ५८ वर्षीय शैलेश जेजुरीकर हे १९८९ मध्ये प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये सहाय्यक ब्रँड मॅनेजर म्हणून रुजू झाले होते. म्हणजेच, गेल्या ३६ वर्षांपासून ते या कंपनीशी जोडलेले आहेत. ते वरिष्ठ नेतृत्व बदलाचा भाग म्हणून सध्याचे सीईओ जॉन मोलर यांची जागा घेतील. संचालक मंडळाने ऑक्टोबर २०२५ मध्ये होणाऱ्या वार्षिक भागधारक बैठकीत संचालक म्हणून निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी जेजुरीकर यांना नामांकित केले आहे.
शैलेश जेजुरीकर कोण आहेत?
भारतात जन्मलेल्या शैलेश जेजुरीकर यांनी हैदराबाद पब्लिक स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी घेतली आणि आयआयएम लखनऊमधून एमबीए केले. १९८९ मध्ये आयआयएम लखनऊमधून एमबीए पूर्ण केल्यानंतर ते थेट पी अँड जीमध्ये रुजू झाले आणि तेव्हापासून त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारतीयांचे वर्चस्व
शैलेश जेजुरीकर यांच्या नियुक्तीमुळे जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर असलेल्या भारतीयांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. सध्या, सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ आहेत, तर सुंदर पिचाई गुगल आणि त्याची होल्डिंग कंपनी अल्फाबेटचे सीईओ आहेत. जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲडोबचे अध्यक्ष आणि सीईओ शंतनु नारायण आणि आयबीएमचे अध्यक्ष आणि सीईओ अरविंद कृष्णा हे देखील भारतीय वंशाचे आहेत.
वाचा - चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
याशिवाय, जागतिक फार्मा कंपनी नोव्हार्टिसचे सीईओ वसंत नरसिंहन आणि जागतिक बायोटेक कंपनी व्हर्टेक्सच्या सीईओ आणि अध्यक्षा रेश्मा केवलरामणी हे देखील भारतीय वंशाचे आहेत. मायक्रोन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि सीईओ संजय मेहरोत्रा, कॅडन्सचे अध्यक्ष आणि सीईओ अनिरुद्ध देवगण आणि चॅनेलच्या ग्लोबल सीईओ लीना नायर यांसारख्या अनेक प्रतिभावान भारतीयांनी जगभरात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. या यादीत आता शैलेश जेजुरीकर यांच्या नावाची भर पडली आहे.