Lady Luck : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. त्यापुढे जाऊन 'लेडी लक' या शब्दावरही अनेकांचा विश्वास आहे. जर तुमच्यासोबत 'लेडी लक' असेल तर गरीबीतून श्रीमंत होण्यासाठी वेळ लागणार नाही. असाच काहीसा प्रकार एका भारतीय वंशाच्या व्यक्तीसोबत घडला आणि तो क्षणात ८ कोटी रुपयांचा मालक बनला. भारतीय वंशाचे अभियंता बालसुब्रमण्यम चितंबरम हे गेल्या २१ वर्षांपासून सिंगापूरमध्ये कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या पत्नीसाठी एक भेटवस्तू खरेदी केली. त्या बदल्यात त्यांना जे मिळाले त्यांनंतर चितंबरम यांचे नशीबच बदलले.
चितंबरम यांनी २ महिन्यांपूर्वी पत्नीसाठी सोन्याचा हार खरेदी केला होता. त्यांनी ही खरेदी सिंगापूरच्या मुस्तफा ज्वेलर्सकडून केली, जे दरवर्षी लकी ड्रॉ काढतात. वास्तविक, मुस्तफा ज्वेलर्सच्या या लकी ड्रॉमध्ये केवळ तेच ग्राहक सहभागी होऊ शकतात ज्यांनी एका वर्षात सुमारे २५० डॉलर्स किंवा त्याहून अधिक किमतीचे दागिने खरेदी केले आहेत. चितंबरम यांनी पत्नीसाठी ६ हजार सिंगापूर डॉलर (सुमारे ३.८० लाख रुपये) किमतीचा हार खरेदी केला होता. त्यामुळे ते या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरले.
लकी ड्रॉने उघडलं नशीब
मुस्तफा ज्वेलर्सने २४ नोव्हेंबर रोजी लकी ड्रॉ जाहीर केला. यावेळी चितंबरम यांना जॅकपॉट लागला. चितंबरम यांनी सांगितले की या दिवशी त्यांच्या वडिलांची चौथी पुण्यतिथी होती. वडिलांनीच त्यांना आशीर्वाद दिल्याचे ते बोलतात. त्यामुळे मी ही आनंदाची बातमी पहिल्यांदा आईला सांगितली. या बक्षिसातील काही रक्कम सिंगापूरमध्ये राहणाऱ्या माझ्या लोकांना दान करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जगण्याचे सोपे सूत्र
बक्षिस जिंकल्यानंतर चितंबरम यांनी सांगितले, की त्यांचे पारितोषिक जिंकणे हा केवळ नशिबाचा किंवा योगायोगाची बाब नाही तर जीवनाच्या नियमाशीही संबंधित आहे. बायकोचा सल्ला नेहमी ऐकतो हा त्यांचा नियम आहे. एप्रिल २०२३ मध्ये मलेशियामध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते. जिथे चेंग नावाचा माणूस आपल्या पत्नीच्या सांगण्यावरून लॉटरी खरेदी करण्यासाठी गेला होता. त्याला ९ लाख डॉलर्सचे बक्षीसही मिळाले होते. वास्तविक, चेंग नेहमी लॉटरीची सामान्य तिकिटे खरेदी करत असे. परंतु, त्या दिवशी पत्नीच्या सल्ल्यानुसार त्याने दुसरे तिकीट खरेदी केले आणि भाग्यवान ठरला.