अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसं ही भूमिका घेत टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर भारत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं अमेरिकन मद्य बॉर्बन व्हिस्कीवरील शुल्क कमी केलंय. बॉर्बन व्हिस्कीवरील शुल्क आता १०० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलंय. यापूर्वी या व्हिस्कीवर १५० टक्के शुल्क लावण्यात आलं होतं. या निर्णयाचा फायदा सनटरीच्या जिम बीमसारख्या ब्रँडच्या आयातीला होणार आहे.
टॅरिफ संदर्भात घोषणा झाल्यानंतर ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या टॅरिफबाबत म्हणताना, भारत इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त कर लावतो असं म्हणत त्यांनी हार्ले डेव्हिडसनचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, भारतात जास्त कर असल्यानं हार्ले-डेव्हिडसनला भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारावा लागला. जेणेकरून त्याला कर भरावा लागणार नाही. भारतासह ब्रिक्स देशांवर १०० टक्के शुल्क लादण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली.
ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर भारत सरकारनं अमेरिकन बॉर्बन व्हिस्कीवरील शुल्क १०० टक्क्यांनी कमी केलंय. पूर्वी सरकार बोर्बन व्हिस्कीवर १५० टक्के शुल्क आकारत होतं, पण आता व्हिस्कीच्या आयातीवर कंपनीला ५० टक्के कर आणि ५० टक्के लेव्ही चार्ज द्यावा लागणार आहे. म्हणजेच आता बॉर्बन व्हिस्कीवर १०० टक्के टॅरिफ लागू होणार आहे. इतर ब्रँडवरील शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारतात ३५ अब्ज डॉलरची बाजारपेठ
विदेशी मद्य कंपन्यांची भारतात ३५ अब्ज डॉलरची बाजारपेठ आहे, मात्र सुधारित शुल्क केवळ अमेरिकेत तयार होणाऱ्या बॉर्बन व्हिस्कीलाच लागू होतं. परंतु इतर अल्कोहोलिक उत्पादनांवर पूर्वीच्या १५०% दरानं कर कायम राहील. डियाजिओ आणि पर्नोड रिकार्ड सारख्या आंतरराष्ट्रीय मद्य कंपन्यांची भारताच्या ३५ अब्ज डॉलरच्या स्पिरिट मार्केटमध्ये उपस्थिती आहे. यापूर्वी अनेक नेत्यांनी अनेकदा परदेशी मद्यावरील उच्च करदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरकपातीची अधिकृत अधिसूचना १३ फेब्रुवारी रोजीच जारी करण्यात आली होती. बॉर्बन व्हिस्कीवरील सीमा शुल्क ५० टक्के असेल आणि अतिरिक्त शुल्क ५० टक्के असेल, त्यामुळे एकूण सीमा शुल्क १०० टक्के होईल.