IT Work Life Balance :आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची नेहमीच चर्चा होते. मात्र, कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक आणि वातावरण याबद्दल फारसं कुणी बोलत नाही. मात्र, एका भारतीय तरुणीने याला वाचा फोडली आहे. ही तरुणी अमेरिकन कंपनीत काम करते. या कंपनीत परदेशी आणि भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये कसा भेदभाव केला जातो यावरुन तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे, जिथे अनेक युजर्सने तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
नेमकं काय घडलं?
ही तरुणी एका अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीत हायब्रिड पद्धतीने काम करते. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, दिवाळीच्या काळात तिला आपल्या गावी जाऊन काम करण्याची इच्छा होती. पण तिच्या मॅनेजरने तिला सांगितले की, "ऑफिसमध्ये कोणीतरी असणे आवश्यक आहे," म्हणून तिला ऑफिसमध्ये यावे लागेल. यामुळे ती खूप दुखावली गेली.
ती म्हणते, "आम्ही त्यांच्यासाठी फक्त स्वस्त कामगार आहोत, हे मला माहीत आहे. पण किमान आम्हाला माणसासारखी तरी वागणूक द्यायला हवी." तिने पोस्टमध्ये अमेरिकन आणि युरोपियन कर्मचारी स्प्रिंग ब्रेक, थँक्सगिव्हिंग आणि ख्रिसमस दरम्यान मोठ्या सुट्ट्या कशा घेतात, याचाही उल्लेख केला. तिच्या टीममधील सर्व लोक दिवाळीत काम करत होते आणि एका कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये येण्यासाठी आपली सुट्टी रद्द करावी लागली, ज्यामुळे तिला अधिक दुःख झाले.
मॅनेजरसोबत वाद, शेवटी रडली
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या या तरुणीने आपल्या वरिष्ठ व्यवस्थापकाशी जोरदार वाद घातला. तिने लिहिले, "माझा माझ्या वरिष्ठ व्यवस्थापकाशी वाद झाला, ज्यात मी रडले आणि त्यांनी मला घरी जावे असे सांगितले." तिचा हा अनुभव अनेकांच्या हृदयाला भिडला आहे.
सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया
या तरुणीच्या पोस्टवर अनेक लोकांनी सहवेदना व्यक्त केली आहे. काही युजर्सने भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अशाच प्रकारे काम चालते असे म्हटले आहे.
एका युजरने लिहिले, "भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये २४x७ काम चालते. मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे, पण दुर्दैवाने इथे तुम्हाला आराम मिळणार नाही."
जर्मनीमध्ये काम करणाऱ्या एका भारतीय युजरने लिहिले, "माझ्या प्रकल्पाची पुण्यात एक छोटी टीम आहे आणि व्यवस्थापक नेहमीच अभिमानाने सांगतात की त्यांची टीम इतकी समर्पित आहे की ते सुट्टीच्या दिवशीही काम करतात."
एका युजरने खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, "काम वाट पाहू शकते, कुटुंब कायमचे राहणार नाही. मॅनेजरने टीमला पाठिंबा दिला नाही तर विमान लवकरच क्रॅश होऊ शकते."
वाचा - AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
या घटनेमुळे भारतीय कॉर्पोरेट संस्कृतीतील कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांची परिस्थिती यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.