लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अमेरिकेने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या आता रशियाकडून केली जाणारी आयात कमी करून पश्चिम आशिया, लॅटिन अमेरिका आणि अमेरिका येथून अधिक कच्चे तेल खरेदी करतील, असे तज्ज्ञ आणि माहीतगार सूत्रांनी सांगितले आहे.
अमेरिकेने २२ ऑक्टोबर रोजी रॉसनेफ्ट व ल्यूकऑइल या रशियाच्या दोन मोठ्या तेल उत्पादक कंपन्यांवर निर्बंध लावले असून, अमेरिकी कंपन्या व नागरिकांना त्यांच्यासोबत व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. या कंपन्यांशी व्यवहार करणाऱ्या इतर देशांनाही दंडात्मक कारवाईचा धोका आहे. सध्या भारत आपल्या एकूण तेल आयातीपैकी जवळपास एक-तृतीयांश तेल रशियाकडून घेतो.
पर्याय काय असू शकतात?
तेल क्षेत्रातील तज्ज्ञ सुमित रितोलिया यांच्या मते, अमेरिकेच्या निर्बंधांपासून बचाव करण्यासाठी भारत थेट रशियाकडून तेल खरेदी कमी करून पश्चिम आशिया, ब्राझील, कॅनडा, प. आफ्रिका आणि अमेरिकेकडून अधिक तेल पुरवठा घेईल.
रशियन तेलावरील अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांनी घातलेल्या ताज्या निर्बंधांचे पालन करून, कंपनी आपल्या रिफायनरीच्या कामकाजात आवश्यक बदल करणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी सांगितले.
