आपल्या उत्पादनांवर जादाचा कर लावणाऱ्या देशांवर आपणही येत्या एप्रिलापासून तसाच कर लावणार असे सांगत टेरिफ वॉरची घोषणा करणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत चर्चा सुरु असल्याचे म्हटले होते. परंतू, ही चर्चा फिस्कटली आहे. यामुळे आता भारतीय उत्पादनांवरही अमेरिका अव्वाचे सव्वा कर लादणार हे नक्की झाले आहे.
येत्या २ एप्रिलपासून भारतासह अन्य देशांवर हा रेसिप्रोकल टेरिफ लावण्यात येणार आहे. भारताने कर कमी करण्याची तयारी दर्शविली असल्याचे, तसेच भारताला वेगळ्या कॅटॅगरीत ठेवणार असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. परंतू, बोलणी फिस्कटल्याने आता या गोष्टी कठीण दिसत आहेत.
दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी वाद सोडविण्यासाठी अमेरिकेच्या व्यापारी आणि अधिकाऱ्यांची एक समिती भारतात आली होती. परंतू, भारतासोबत या समितीची चर्चा कोणत्याही निर्णयाशिवाय संपली आहे. दोन्ही देशांनी या वर्षाच्या अखेरीस द्विपक्षीय व्यापार कराराचे काही भागांवर अंतिम सहमती बनविण्याची तयारी दर्शविली होती. परंतू चर्चेअंती भारताला कोणत्याही प्रकारच्या शुल्कात सवलत देण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सिनेटमध्ये या परस्पर कराची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी खास कॅनडा, भारताचे नाव घेतले होते. तसेच २ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. आता अमेरिकी समितीचा दौरा संपला असून काहीच फलीत न निघाल्याने आता भारताला अमेरिकेच्या टेरिफ वॉरला तोंड द्यावे लागणार आहे. दोन्ही देशांनी काही विशिष्ट क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा केली. यामध्ये बाजारपेठेतील प्रवेश वाढवणे, टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळे कमी करणे आणि पुरवठा साखळी सुधारणे समाविष्ट आहे. अमेरिकेच्या शुल्कामुळे पुढील आर्थिक वर्षात भारताची निर्यात ७.३ अब्ज डॉलर्सपर्यंत कमी होऊ शकते, असा अंदाज क्रेडिट रेटिंग एजन्सीने व्यक्त केला आहे.