India vs Pakistan T20 WC: क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले की, रोमांच फक्त चौकार-षटकारांपुरता मर्यादित नसतो. टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज(दि.१५) कोलंबो येथे होणाऱ्या या महामुकाबल्याने जाहिरात, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही प्रचंड आर्थिक हालचाल निर्माण केली आहे. या सामन्यासाठी टीव्हीवरील १० सेकंदांच्या जाहिरातीची किंमत थेट ३० ते ४० लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून, ब्रॉडकास्टर जिओस्टार (JioStar) ला संपूर्ण स्पर्धेतून सुमारे २,००० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
जाहिरातीचे दर गगनाला भिडले...
ब्रँड्समध्ये या सामन्यासाठी प्रचंड स्पर्धा पाहायला मिळत आहे. टीओआयच्या अहवालानुसार, वर्ल्ड कपमधील मोठ्या सामन्यांसाठी सामान्यतः १० सेकंदांचा टीव्ही स्लॉट २०-२५ लाख रुपये असतो. मात्र भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ही किंमत ३०-४० लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. स्पोर्ट्स अॅनालिस्ट नीरज झा यांच्या मते, शेवटच्या क्षणी उपलब्ध असलेल्या जाहिरात इन्व्हेंटरीत २०-२५ टक्क्यांची वाढ झाली असून, सामन्याचा जवळजवळ प्रत्येक सेकंद जाहिरातींनी व्यापलेला असेल.
डिजिटल प्लॅटफॉर्मचे दरही वाढले
टीव्हीबरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्म ‘जिओ-हॉटस्टार’ वरही जाहिरात दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. येथे १० सेकंदांच्या जाहिरात स्लॉटची किंमत १५-20 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या महामुकाबल्यात जाहिरात देणाऱ्या कंपन्यांमध्ये एमिरेट्स, ओपनएआय (OpenAI), बिर्ला ओपस, रॅपिडो, अमूल, महिंद्रा, हुंडई, ब्रिटानिया आणि जनरल इन्शुरन्स कौन्सिल यांसारख्या दिग्गज ब्रँड्सचा समावेश आहे. मार्केटिंग फर्म कोमर्ज़ (Komerz) च्या तज्ज्ञांच्या मते, ऑटोमोबाईल, एफएमसीजी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रातील कंपन्या ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमावू इच्छित नाहीत.
कोलंबोकडे जाणाऱ्या चाहत्यांमुळे प्रवास महाग
या सामन्याचा रोमांच फक्त टीव्ही स्क्रीनपुरता मर्यादित राहिलेला नाही. हजारो भारतीय चाहते कोलंबोकडे रवाना झाले आहेत. ईजमायट्रिप आणि मेकमायट्रिप च्या आकडेवारीनुसार, कोलंबोसाठी हवाई तिकिटांच्या मागणीत 65 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. श्रीलंकेकडून मिळालेल्या व्हिसा-मुक्त प्रवेशामुळे भारतीय चाहत्यांसाठी प्रवास अधिक सोपा झाला असून, त्याचा थेट परिणाम भाड्यांवर झाला आहे. भारतातील प्रमुख महानगरांतून कोलंबोकडे जाणाऱ्या फ्लाइट्सचे दर ४५-५० टक्क्यांनी वाढले आहेत.
हॉटेल बुकिंगमध्ये दुप्पट वाढ
कोलंबोमधील फोर आणि फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये सामन्याच्या आठवड्याअखेरीस खोल्या मिळणे कठीण झाले आहे. क्लियरट्रिप च्या माहितीनुसार, या कालावधीत हॉटेल बुकिंग्स सामान्यपेक्षा दुप्पट झाल्या आहेत. प्रीमियम हॉटेल्सनी आपल्या रूम रेट्समध्ये २९-२५ टक्क्यांची वाढ केली असून, मुख्य स्टेडियमजवळील हॉटेल्सना सर्वाधिक पसंती दिली जात आहे.
